सणावाराचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे, सध्या खरेदी करण्यावर सर्वांचाच जोर आहे. खेरदीसाठी मोठमोठी दुकाने आणि मॉल्सचा वापर हा होतोच. भलेमोठे मॉल्स, चकचकीत दुकाने, सगळ्याच वस्तूंची रेलचेल, वस्तूची माहिती देण्यासाठी सेल्समन आदींमुळे ग्राहक अगदी मनमुराद खरेदी करतो. ही खरेदी करताना बिल किती होईल याची चिंता त्याला नसते. एक वस्तू खरेदी करायला गेलेला ग्राहक तब्बल दहा अनावश्यक वस्तू घेऊन येतो. खिशात पैसे कमी असतानाही ग्राहक केवळ आनंद मिळत असल्याने अवाढव्य खरेदी करतात असे एका संशोधनात आढळले.
मॉल्स तयार झाल्यापासून साबण, तेल, शांपू, कपडे, भांडी आदी सर्वच बाबी एका छताखाली मिळतात. भरमसाठ वस्तू खरेदीतून मिळणारा आनंद आणि खर्चावर नसलेल्या नियंत्रणामुळे हे घडते, असे सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठातील संशोधकांना आढळले. वस्तूंची भरमसाठ खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मानसिकतेचा त्यांनी अभ्यास केला. या प्रयोगासाठी १६०० जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांना पैशाचे व्यवस्थापन, खरेदीची सवय आणि वस्तूंची गरज यावर प्रश्न विचारण्यात आले. या सर्वामध्ये पैशाचे व्यवस्थापन करण्यात मोठया प्रमाणावर निष्काळजीपणा आढळला. ते क्रेडिट कार्डवरून खरेदी करताना बिलाची चिंता करीत नाहीत, असेही संशोधनात आढळले.
खरेदीत रस घेणारी मंडळी क्रेडिट कार्डच्या बिलाकडे दुर्लक्ष करतात. अधिक खरेदी केल्याने त्यांचा मूड बदलतो. आपण फार मोठे असल्याचा समज त्यांना होतो. तसेच क्रेडिट कार्डने पैसे द्यायचे असल्याने पैसे देतानाचे दु:ख त्यांना होत नाही, असे विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक रायन हॉवेल यांनी सांगितले.

Story img Loader