Do Not Store Curd in this Utensils: दही आरोग्यासाठी, त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपण ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे. दही खाल्ल्याने शरीराला चांगले जीवाणू मिळतात, ज्यामुळे उष्ण हवामानातही पोट निरोगी राहते. एवढेच नाही, तर दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-६, बी-१२, रिबोफ्लेविनसारखे पोषक घटक आढळतात, जे शरीर निरोगी ठेवतात.

दही प्रत्येक घरात वापरले जाते. काही लोक बाजारातून दही खरेदी करतात; तर काही लोक घरी दही बनवणे पसंत करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, घरी दही बनवताना केलेली एक चूक तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. दही कधीही चुकून काही भांड्यांमध्ये लावू नये. जर असे केले, तर त्याचा आरोग्यावर विषासारखा वाईट परिणाम होऊ शकतो. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊ…

कोणत्या भांड्यात दही लावू नये? (Do Not store Curd in Brass and Copper)

दही लावण्यासाठी कधीही तांबे किंवा पितळेची भांडी वापरू नयेत. कारण- जेव्हा या भांड्यांमध्ये दही लावले जाते तेव्हा ज्या धातूंपासून ती भांडी बनवली जातात, ती दह्याशी रासायनिक अभिक्रिया करू लागतात. अशा परिस्थितीत हे दही खाण्यासाठी योग्य राहत नाही. ते खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

कोणत्या भांड्यात दही लावणे सुरक्षित? (In which utensils should curd be stored)

साधारणपणे महिला घरी दही बनवण्यासाठी स्टीलची भांडी वापरतात. त्याशिवाय तुम्ही सिरॅमिकपासून बनवलेली भांडीदेखील वापरू शकता. दही लावण्यासाठी सर्वोत्तम भांडे म्हणजे मातीचे भांडे. त्यात साठलेले दही आरोग्यासाठी फायदेशीर असते.