मधुमेहाच्या आजाराबाबत विविध वैद्यकीय संघटना समाजामध्ये जागृती करीत असल्या तरी शहरी आणि ग्रामीण भागातील बदलती जीवनशैली आणि आहारामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: देशात १८ ते ४० या वयोगटात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मधुमेह रुग्णांच्या उपचारासाठी वरदान असलेल्या इन्शुलिनचा शोध फॅडरिक ब्रेनटिंग आणि चार्लस ब्सेट यांनी लावला असून त्यांच्या आठवणीत १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून देशभर पाळला जातो. यानिमित्त शहरातील मधुमेह तज्ज्ञ आणि डायबिटीज् केअर अॅण्ड रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ. सुनील गुप्ता आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्रविभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांच्याशी संवाद झाला. यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले, मधुमेह हा आजार असून पूर्वी चाळीशी पार केलेल्या व्यक्तीला तो होत असे, मात्र गेल्या पाच सहा वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून त्यात १८ ते ४० या वयोगटातील युवकांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. उपराजधानीत तीन लाखावर लोकांना मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले असून त्यात युवकांचे प्रमाण ३० ते ४० टक्के आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खानपानामुळे हल्ली लहान मुलांमध्ये लठ्ठपणा मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा मुलांना मधुमेह होण्याची दाट शक्यता आहे. विशेषत: शहरात हे प्रमाण मोठे आहे. ग्रामीण भागात या रुग्णांची संख्या ४ ते ५ टक्के आहे आणि शहरात दुप्पट आहे. भारतात मधुमेहाचे वाढणारे रुग्ण बघता २०२५ पर्यंत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये १५० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. शहरातील काही शाळांमध्ये सर्वेक्षण केले असताना २७ ते २८ टक्के मुलांमध्ये आरओसी प्रमाण आढळले आहे. सध्याच्या काळात मनुष्याची जीवन जगण्याची पद्धत, कुठले पदार्थ खावे आणि कुठले पदार्थ खाऊ नये याबाबत समाजात नसलेली जागृती, तणाव यामुळे मधुमेह आणि रक्तदाबाच्या संख्येत वाढ झाली आहे. अन्नपदार्थाच्या नव्या शैलीमुळे तसेच त्यातील घटक पदार्थामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. सोडियम क्लोराईडच्या वापरामुळे उच्च रक्तदाब, मूत्रिपड निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे, अशा गोष्टी संभवतात. आरोग्याची ही समस्या कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. पॅकबंद असलेले पदार्थ घेताना त्यातील घटक पदार्थ तपासले पाहिजे. डॉ. अशोक मदान म्हणाले, मधुमेहामुळे डोळ्यांवर परिणाम होतो आणि कालांतराने कायमचे अंधत्व येते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये दृष्टीपटलाची बाधा दरवर्षी १८ टक्क्यांनी वाढत आहे. प्रामुख्याने दृष्टीपटलाची बाधा आणि त्यावरील गुंतागुंत हे डोळ्यावर होणारे मुख्य परिणाम आहेत. दृष्टीपटलावर नवीन रक्तवाहिन्या वाढतात व त्या फुटून डोळ्यात रक्तस्त्राव होतो. रक्तस्त्राव खूप वाढला तर दृष्टी जाण्याची शक्यता असते. मधुमेहीमध्ये मोतीबिंदू तरुण वयात होतो. मधुमेहीमधील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणून मोतीबिंदू शस्त्रक्रिया कृत्रिम लेन्स टाकून करता येते. मधुमेही रुग्णांना सामान्यापेक्षा ४० टक्के पेक्षा जास्त काचबिंदू होण्याची शक्यता आहे.

Story img Loader