Happy Independence Day 2022: यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात १५ ऑगस्टचा सोहळा अत्यंत विशेष असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा या अभियानाची घोषणा केल्यावर देशविदेशातील अनेक भारतीयांच्या सोशल मीडियावर तिरंगा झळकत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त अनेक सोसायटी किंवा परिसरात सुद्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच प्रत्येक शाळेत वक्तृत्व, वेशभूषा, निबंध लेखन अशा स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेसाठी हौशी पालक अगदी एक आठवडा आधीपासूनच तयारीला लागतात. आज आपण यातील फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी करता येतील अशा काही लुक विषयी आयडीयाज पाहणार आहोत.
एक महत्त्वाची बाब फॅन्सी ड्रेस म्हणजे आपल्याला केवळ कपडेच नाही तर त्या व्यक्तिमत्वाप्रमाणे एक दोन वाक्य तरी बोलणे अपेक्षित असते. त्यामुळे लुक सह आपण कोणती वाक्य तयार करून जाऊ शकता हे सुद्धा आपण जाणून घेऊयात..
करोनाचा हल्ला
आपल्याला काही हटके करायचे असेल तर आपण कोरोनाचा लुक करून “मी तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मला हरवून स्वतंत्र झालात” अशा पद्धतीची वाक्ये सुद्धा वापरू शकता.
तिरंगा
आपण आपल्या मुलांना तिरंग्याच्या रंगात रंगवून, “मी भारताचा झेंडा आहे मला तुम्ही आज गौरवाने वागवता पण उद्या तुम्ही माझा किती मान ठेवता यावरून आपले देशप्रेम ठरते” अशी वाक्य घेऊन सामाजिक संदेश देऊ शकता.
भारतमाता
स्वातंत्र्य दिनाचा ठरलेला लुक म्हणजे भारतमाता. लाल किंवा केशरी रंगाचा काठ असलेली एखादी पांढरी साडी नेसून हातात तिरंगा व डोक्यावर सोनेरी पट्ट्याचा मुकुट घालून आपण हा लुक करू शकता. यावेळी ‘मला माझ्या वीरपुत्रांवर, मेहनती बाळांवर अभिमान आहे’ अशा पद्धतीचं वाक्य शिकवून मुलींना तयार करा.
महात्मा गांधी
धोतर, गोल चष्मा व हातात काठी घेऊन साधा सरळ लुक करता येईल. महात्मा गांधी लुक करून ‘खेड्याकडे चला’ अशा पद्धतीची घोषवाक्ये आपण शिकवू शकता.
लोकमान्य टिळक
पांढरा सदरा व त्यावर लाल रंगाची पगडी व हातात उपरणं अशा पद्धतीचा लुक आपण करू शकता. टिळकांची जगप्रसिद्ध वाक्य म्हणजे स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी घेणारच किंवा मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफलं उचलणार नाही हे शिकवून तुम्ही तुमच्या मुलांना तयार करू शकाल. अशाच पद्धतीने आपण अन्य क्रांतिकाऱ्यांच्या वेशभूषा तयार करू शकता.
यंदा कोरोनाच्या नंतर पहिल्यांदाच शाळा पूर्णपणे सुरु आहेत, त्यामुळे प्रत्येक स्पर्धेचा व कार्यक्रमाचा उत्साह निश्चितच जास्त असणार आहे. तुमच्याही चिमकुल्याला हे सर्व अनुभव भरभरून घेऊ द्या.