भारत गौरव योजनेंतर्गत देशातील पहिली खासगी रेल्वे सेवेला मंगळवारी कोईम्बतूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही ट्रेन कोईम्बतूरहून मंगळवारी निघाली असून गुरुवारी शिर्डीतील साई नगरला पोहोचेल. या स्पेशल ट्रेनमध्ये १५०० लोक प्रवास करू शकतात. दक्षिण रेल्वेचे सीपीआरओ बी गुग्नेसन यांनी ही माहिती दिली आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या रिपोर्टनुसार, त्यांनी सांगितले की, रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला २ वर्षांसाठी लीजवर दिली आहे. सर्व्हिस प्रोव्हायडरने कोचच्या जागांचे नूतनीकरण केले आहे. महिन्याला किमान तीन ट्रीप केल्या जातील. यात फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण २० डबे आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिर्डीला पोहोचण्यापूर्वी ट्रेनला तिरुपूर, इरोड, सेलम जोलारपेट, बेंगळुरू येलाहंका, धर्मावरा, मंत्रालयम रोड आणि वाडी येथे थांबे असतील. अधिकृत प्रसिद्धीनुसार, या ट्रेनचे भाडे भारतीय रेल्वेकडून आकारल्या जाणार्या नियमित रेल्वे तिकीट दरांच्या बरोबरीचे आहे आणि शिर्डी साईबाबा मंदिरात विशेष व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था केली जाईल. ट्रेनची देखभाल हाऊसकीपिंग सर्विस प्रोवाइडर्सद्वारे केली जाईल, जे संपूर्ण प्रवासादरम्यान काही काही वेळाने साफसफाई करतील. तसेच ट्रेनमध्ये शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.रेल्वे पोलिस दलासह रेल्वे कॅप्टन, एक डॉक्टर, खासगी सुरक्षा कर्मचारी असतील.
दरम्यान, रेल्वेच्या या सेवेच्या निषेधार्थ दक्षिण रेल्वे मजदूर युनियनच्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गटाने शहरातील रेल्वे स्थानकावर निदर्शने केली. रिपोर्टनुसार, या ट्रेनमधील स्लीपरना नॉन एसीसाठी २,५०० रुपये, थर्ड एसीसाठी ५,००० रुपये, सेकंड एसीसाठी ७,००० रुपये आणि फर्स्ट एसीसाठी १०,००० रुपये मोजावे लागतील.