ब्रिटिश वसाहतवादी राजवटीपासून (British colonial rule) देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व आहे कारण भारतातील २०० वर्षांहून अधिक ब्रिटीश सत्तेचा अंत म्हणून ओळखला जाणारा तो दिवस होता. यंदा भारत देश आपला ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरुवातीला २६ जानेवारी १९३० रोजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती. ही तारीखनंतर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला तर १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. वसाहतवादी राजवटीवरील भारताच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस निवडण्यात आला. मात्र तुम्हाला माहिती आहे का १५ ऑगस्ट हा दिवस जसा भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो तसेच आणखी तीन देश आहेत जे आपला स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी साजरा करतात. तर हे देश कोणकोणते आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
उत्तर आणि दक्षिण कोरिया
जपान देशाच्या गुलामगिरीमध्ये अडकलेल्या उत्तर आणि दक्षिण कोरिया या देशांना कठीण संघर्षानंतर १५ ऑगस्ट १९४५ रोजी स्वातंत्र्य मिळाले. दरम्यान, अमेरिका आणि सोव्हिएत सैन्याने एकत्रितपणे जपानचा कोरियावरील ताबा संपुष्टात आणला. त्यानंतर १९४८ मध्ये उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया असे दोन देश निर्माण झाले.
बहरीन (Bahrain)
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जसा १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो तसाच बहरीनमध्ये देखील १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. बहरीनला १९७१ मध्ये ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. त्या काळामध्ये ब्रिटीशांनी बहरीन, अरेबिया आणि पोर्तुगालसह अनेक बेटांवर राज्य केले.
हेही वाचा : Health Special: साखरेला मध पर्याय ठरु शकतो?
लिकटेंस्टाईन (Liechtenstein)
भारतासाह लिकटेन्स्टाईन देशदेखील १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. वास्तविक हा जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. हा देश स्वातंत्र्यापूर्वी जर्मनीच्या ताब्यात होता. मात्र १९४० मध्ये १५ ऑगस्ट हा दिवस ये देशात राष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून लिकटेंस्टाईनचे नागरिक १५ ऑगस्ट रोजी हा दिवस स्वातंत्र्यदिन साजरा करतो.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)