भारतात दिवसागणिक स्मार्टफोनची संख्या वाढत असताना मोबाइलवरुन ऑनलाइन असणाऱ्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. स्मार्टफोन हा जणू प्रत्येकाच्या शरीराचा एक अविभाज्य भागच झाला आहे. सध्या बघावं तिथे लोक मोबाइलवर काही ना काही करताना दिसतात. कधी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी तर कधी प्रवासादरम्यान गाणी ऐकण्यासाठी नाहीतर व्हिडीयो पाहण्यासाठी या मोबाइलचा सर्रास वापर होताना दिसतो. हे चित्र जगभरात असेच असले तरीही भारतात मोबाइल वापरणाऱ्यांचे आणि ऑनलाइन असणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे नुकत्याच कॉमस्कोअर कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
हा जगभरातील ऑनलाइन असणाऱ्यांचा सर्वाधिक आकडा असल्याचेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. जगभरात मोबाइलचा वापर करण्याचे प्रमाण ३० ट्क्केच आहे. त्यापैकी जवळपास ९० टक्के युजर्स भारतातील असल्याने ही नक्कीच चिंतेची बाब आहे. हे सर्वेक्षण २०१७ मध्ये करण्यात आले होते. भारतानंतर इंडोनेशिया देशाचा मोबाइलच्या वापरात क्रमांक लागतो. इंडोनेशियामधील ८७ टक्के लोक मोबाइलवर ऑनलाइन असतात. त्यानंतर मॅक्सिको आणि अर्जेंटीना येथील अनुक्रमे ८० आणि ७७ टक्के नागरिक मोबाइलवरुन ऑनलाइन असल्याचे यामध्ये नोंदविण्यात आले आहे.
त्यामुळे एक भारतीय मागील वर्षी ३ हजार मिनिटे किंवा ५० तास मोबाइलवरुन ऑनलाइन होता. तर हेच कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरुन ऑनलाइन असणाऱ्यांचे प्रमाण १२०० मिनिटे होते. तर अर्जेंटीना आणि अमेरिका या देशांमधील लोक मोबाइलवरुन ६ हजार ते ५ हजार मिनिटे ऑनलाइन असतात. यामध्ये नोंदविण्यात आलेल्या निष्कर्षानुसार ऑनलाइन असणारे हे लोक व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटसवर असतात. याशिवाय गुगल प्ले, युट्यूब, जिमेल आणि गुगल सर्च हेही सर्वाधिक वेळ घालविला जाणारी माध्यमे आहेत. यामध्येही व्हॉटसअॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्लिकेशन आहे असेही यामध्ये नोंदविण्यात आले आहे.