देशाची राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढले असून यामुळे संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे. वायू प्रदूषणामुळे या परिसरातील नागरिकांना अनेक आरोग्यविषयक सामान्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र आता या प्रदूषणाचा लोकांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ लागला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याची परिस्थिती लोकांच्या शारीरिक संबंधांवर प्रभाव पाडत आहे.
तज्ज्ञांनुसार, वायू प्रदूषणाच्या प्रभावामुळे लोकांची शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. तसेच, या समस्येमुळे पुरुषांच्या शुक्राणूंची (स्पर्म्स) संख्याही सातत्याने घटत आहे. त्यामुळे वेळीच खबरदारी घेतली नाही तर परिस्थिती आणखीनच बिकट होऊ शकते. यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्याही वाढू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हवेमध्ये असे अनेक घटक असतात जे आपल्या शरीरातील हार्मोन्सवर थेट प्रभाव पाडतात. अनेकदा स्त्रीरोग समस्या म्हणून वंध्यत्वाकडे पाहिले जाते. मात्र भारतातील वंध्यत्वाच्या स्थितीवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या अलीकडील अहवालानुसार, या समस्येशी निगडित सर्व प्रकारणांपैकी जवळपास ५०% पुरुषांमध्ये प्रजनन विसंगतींमुळे वंध्यत्वाची तक्रार जाणवते. हे प्रमाण महिलांच्या तुलनेत जास्त आहे.
Women Health: योनीतुन होणाऱ्या स्रावाचा रंग कोणता असावा? गंभीर आजाराची प्रमुख लक्षणे वेळीच ओळखा
स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. लवली जेठवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब गुणवत्तेच्या हवेत जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा हवेतील सूक्ष्मकणांसह पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन्स आपल्या शरीरात प्रवेश करतात. हे पुरुषांच्या शुक्राणूंसाठी हानिकारक असतात. मात्र, केवळ हवेतील प्रदूषण हेच शुक्राणूंची संख्या कमी करण्यास कारणीभूत नसून, धूम्रपान आणि मद्यपानही या संख्येवर प्रभाव पडतात.
हवेतील या सूक्ष्मकणांमध्ये शिसे, कॅडमियम आणि पारा अशी रसायनेही मिसळलेली असतात. ही रसायने हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम करतात तसेच ते पुरुषांच्या शुक्राणूंसाठी हानिकारक असतात. अनेक प्रकरणांमध्ये असेही दिसून आले आहे की प्रदूषणामुळे टेस्टोस्टेरॉन किंवा एस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे लोकांची शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छाही कमी होते.
एस्ट्रोजेन हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा हार्मोन आहे. हे अंडाशयात तयार होते आणि नंतर रक्तात मिसळून शरीराच्या पुनरुत्पादक अवयवांवर परिणाम करते. प्रदूषित हवेतील क्लोरीन आणि डीडीटीसारखी रसायने आपल्या आरोग्याला नुकसान पोहचवत असून ही रसायने आपल्या शरीरात प्रवेश करून एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉनसारख्या महत्त्वाच्या हार्मोन्समध्ये मिसळत आहेत. एस्ट्रोजेन इतका प्रभावी असतो की त्याच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि भावनिक बदल होतात. तसेच, यामुळे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छाही कमी होते.
महागड्या औषधांशिवायच कमी करता येईल उच्च रक्तदाबाची समस्या; जाणून घ्या, कसं
या समस्येपासून बचाव करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. शक्य तितके पाणी प्या. भरपूर पानी प्यायल्याने श्वसनमार्ग आणि फुफ्फुसातील धूळ साफ करण्यास मदत होते. तसेच, तुम्हाला सतत डोकेदुखी, श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच, बाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका.