नवी दिल्ली : हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यासाठी फ्लूच्या लस लाभदायी आहे, असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. हृदयरुग्णांसाठी ही एक नक्कीच चांगली बातमी आहे. मधुमेह, हृदयरोग, अस्थमा, श्वसनासंबंधी आजार असलेल्या ६५ वर्षांवरील व्यक्तींनी हे लसीकरण करणे आवश्यक आहे, असा दावाही या नव्या संशोधनानंतर करण्यात आला आहे.
१० देशात अभ्यास
एम्सच्या कार्डिओलॉजी विभागाच्या संशोधनानुसार इन्फ्लुएंझाचे लसीकरण हे हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो. कमकुवत हृदय असलेल्या आणि हृदयविकाराचा झटका या अगोदर आलेल्या व्यक्तींनी असे लसीकरण आवर्जून करावे. हे संशोधन यंदा लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाले होते. याचे नेतृत्व एम्सच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. अंबुज रॉय यांनी केले होते. हे संशोधन आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील दहा देशांतील ३० केंद्रांवर करण्यात आले होते. यामधील सात केंद्रे भारतात होती.
संशोधन कसे महत्त्वाचे?
डॉ. रॉय यांनी सांगितले की, इन्फ्लुएंझा संसर्ग हृदयसंबंधी आजार आणि मृत्यूचा धोका वाढवण्यास जबाबदार आहे. त्यामुळे वयोवृद्ध रुग्णांनी हे लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरण केलेल्या व्यक्तींना हृदयरोगाचा झटका, ‘स्ट्रोक’ आणि हृदयरोगासंबंधी सुमारे २८ टक्के घट झाली.