Store ginger at home: भारतीय स्वयंपाकघरात आल्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सकाळच्या चहापासून ते विविध अन्नपदार्थ बनवण्यापर्यंत अनेक पदार्थांमध्ये आल्याचा वापर केला जातो. त्याशिवाय आल्याचा इतर आरोग्यदायी फायद्यांसाठीही वापर केला जातो. पचनक्रिया सुधारणे, सूज कमी करणे आणि सर्दी व खोकल्यापासून आराम देण्यासाठीही याचा वापर केला जातो. थोडक्यात आल्याचा वापर मसाला, पेस्टसाठी आणि औषध म्हणूनही केला जातो. परंतु, अनेकदा आले लवकर खराब होते. अशा वेळी ते दीर्घकाळ साठवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.
आले कसे साठवायचे?
हिवाळा असो वा उन्हाळा प्रत्येक ऋतूत आल्याचा वापर केला जातो. मात्र, त्याची साठवणूक करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जर तुम्हीही जास्त काळ आले साठवून ठेवण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही हॅक्स घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही आले जास्त काळ साठवण्यासह ते जास्त काळ ताजेही ठेवू शकता.
आले खराब होण्यापासून कसे वाचवायचे?
आले खरेदी करताना, ते ताजे खरेदी करा. बाजारातून वाळलेले आले घरी आणले, तर ते लवकर खराब होते. त्याच वेळी ओले आले विकत घेऊ नये. कारण- ते लगेच खराब होऊ शकते.
एअरटाइट कंटेनर वापरा
आले साठवण्यासाठी नेहमी हवाबंद कंटेनर वापरा. त्यासाठी न सोललेले आले एअरटाईट डब्यात ठेवा आणि बंद करा. त्यामुळे ते बराच काळ ताजे राहते.
हेही वाचा: मक्याची भाकरी बनवताना तुटतेय? मग ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा टम्म फुगलेली लुसलुशीत भाकरी
आले वाळवून साठवा
तुम्ही आले सुकवूनही साठवू शकता. ते सुकवण्यासाठी आधी आल्याचे पातळ काप करून घ्या. आता उन्हात ते नीट वाळवा. ते पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर तुम्ही ते हवाबंद जारमध्ये ठेवू शकता.. त्यामुळे महिनाभर ते खराब होणार नाही.