आपल्या विशाल समुद्रात कितीतरी प्राणी, जीव असतात; ज्यांची आपल्याला माहिती नसते. अशाच समुद्री जीवांमध्ये जेली फिश हा सर्वांत वेगळी प्रजाती आहे. कारण- हा जीव गरम वा थंड पाण्यात, खोल समुद्रात किंवा अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर अशा कुठल्याही भागांमध्ये किंवा वातावरणामध्ये तुम्हाला दिसू शकतो. हवामान कसंही असू दे, थोडी सवय झाल्यानंतर, जेली फिशला कुठल्याही प्रकारच्या वातावरणात सहज राहता येतं. हा जीव इतर अन्य समुद्री प्राणांपासून खूप वेगळा असतो.
जेली फिशचा आकार एखाद्या छत्रीप्रमाणे असून, त्याला तंतूंसारखे अनेक पाय असतात. या समुद्री जीवाला मेंदू आणि शरीर दोन्हीही नसलं तरीही त्याला सर्वांत हुशार जीव म्हटलं जातं. जेली फिशचा खेकडे, कोळंबी, मासे आणि समुद्रातील छोट्या वनस्पती हा आहार असतो. या समुद्री प्राण्यासाठी दरवर्षी जागतिक जेली फिश दिवस साजरा केला जातो; पण हा दिवस साजरा करताना या बुद्धिमान समुद्री जीवाबद्दल थोडी रंजक माहितीसुद्धा घेऊ या.
जागतिक जेली फिश दिवस कधी साजरा केला जातो?
३ नोव्हेंबरला जागतिक जेली फिश दिवस साजरा करतात.
केव्हा सुरू झाला जागतिक जेली फिश दिवस?
नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीच्या दक्षिणी भागात वसंत ऋतूचं आगमन होत असतं. अशा हवामानामध्ये जेली फिश पृथ्वीच्या दक्षिणी भागाच्या किनारपट्टीजवळ येत असतात. जागतिक जेली फिश दिवस २०१४ पासून ३ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
हेही वाचा : डोक्यावर शिंग अन् डोळ्यात टॅटू? मांजरासारखं दिसण्यासाठी शरीरात केले इतके बदल!
जेली फिशचे महत्त्व.
जेली फिश हा समुद्री जीवांच्या संशोधन व अभ्यासांमध्ये अत्यंत महत्त्वाचा जीव आहे. त्याचप्रमाणे सागरी जैवविविधतेसाठीही जेली फिश महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जातं. त्याचा वापर अन्नपदार्थांमध्ये केला जातो. चायनामध्ये जेली फिशपासून तयार होणाऱ्या पदार्थांना फार महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या जीवाला त्यांच्या संस्कृतीमध्येही विशेष स्थान आहे. जेली फिशच्या तंतूसमान पायांवर लहान लहान मासे घर करून राहू शकतात.
जेली फिश हा ५,००० लाख वर्षांपासून म्हणजे डायनासॉरपेक्षाही खूप आधीपासून या पृथ्वीवर वास करतोय, असं म्हटलं जातं. जेली फिशमध्ये हृदय किंवा हाडं नसतात. असं असलं तरीही त्यांच्यात मज्जासंस्था आणि शरीराच्या मध्यभागी तोंड असतं. काही जेली फिश हे अंधारात चमकतात. अशा या अनोख्या जेली फिशसाठी साजरा केला जाणारा जागतिक जेली फिश दिवस तुम्ही एखाद्या मत्स्यसंग्रहालयाला भेट देऊन, समुद्री जीवजंतूंबद्दल माहिती घेऊन आणि त्यांचं निरीक्षण करून साजरा करू शकता.