डाव्या हाताच्या व्यक्तींची खासियत आणि वेगळेपण साजरं करण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस’ साजरा केला जातो. दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. उजव्या हाताने लिहिणाऱ्यांची प्रचंड मोठी संख्या असलेल्या या जगात तुलनेने अगदी कमी संख्या असलेल्या डाव्या हाताचा वापर करणाऱ्या व्यक्तींसाठी ‘आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँडर्स डे’ हा एक विशेष दिवस आहे. या दिवशी डाव्या हाताने काम करण्याचे फायदे, तोटे आणि वैशिष्ट्ये या सर्व विषयांवर चर्चा केली जाते. त्याबद्दल जनजागृती केली जाते. लेफ्टहँडर्स इंटरनॅशनल सुरू करणारे डीन आर कॅम्पबेल यांनी १९७६ साली हा दिवस पहिल्यांदा साजरा केला होता.
जगातील ७ ते १० टक्के लोक डावखुरे आहेत
एका अभ्यासानुसार, जगातील फक्त ७ ते १० टक्के लोक डावखुरे आहेत म्हणजेच ते आपली दैनंदिन बहुतेक कामं डाव्या हातानेचं करतात. परंतु, डावखुऱ्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ, जगातील बहुतांश मशीन्स या उजव्या हाताच्या वापरानुसार बनवल्या जातात. त्यामुळे, साधी साधी कामं करण्यास डावखुऱ्या व्यक्तींना बराच त्रास सहन करावा लागतो.
लोक डावखुरे का असतात?
अनुवांशिक कारणांमुळे एखादा व्यक्ती डावखुरा असतो, असं सांगितलं जातं. याशिवाय, मुलींपेक्षा जास्त मुले डावखुरी असतात, असंही सामोरं आलं आहे. त्यामागे टेस्टोस्टेरॉन हार्मोन जबाबदार मानला जातो. काही तज्ञांनी असंही मत मांडलं आहे कि, लहान वयातच मेंदूला झालेल्या सौम्य नुकसानीमुळे हे होतं असावं. मात्र, डावा हात आणि मेंदू यांच्या संदर्भात कोणताही वैध सिद्धांत समोर आलेला नाही. काही अभ्यासामध्ये हे सिद्ध झालं आहे की, एखादी व्यक्ती डावखुरी आहे का? हे मातेच्या गर्भाशयातच निश्चित होतं. पालकांकडून विशिष्ट प्रकारचा जनुक वारसा मिळाले असतो. त्याला डाव्या हाताची जनुकं म्हणता येईल. मात्र, या जनुकामागची कारणं कोणती यावर अद्याप संशोधन सुरू आहे. वेगवेगळ्या तज्ञांची मतं देखील भिन्न आहेत.
डावखुऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
काही अभ्यासांमार्फत डावखुऱ्या व्यक्तींची काही खास वैशिष्ट्ये सांगितली गेली आहेत. ज्यामुळे त्यांची खासियत आणखी वाढते.
- डावखुऱ्या व्यक्तींचा वाचनाचा वेग खूप जास्त असतो.
- प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता असते.
- संगीत आणि कला क्षेत्रात आपल्या कल्पनाशक्तीचा सर्वाधिक वापर करतात.
- अनेक डावखुऱ्या व्यक्ती सर्जनशील विचारवंत असतात.
- खेळामध्ये खूप रस असतो.
- कोणतेही काम परफेक्शनने करण्यावर आमचा विश्वास आहे.