International Men’s Day 2024: दरवर्षी, १९ नोव्हेंबरला जगातील ३० हून अधिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Men’s Day 2024) म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच ज्याप्रमाणे ८ मार्च हा महिलांसाठी खास दिवस आहे, त्याचप्रमाणे १९ नोव्हेंबर हा पुरुषांसाठी खास दिवस असतो. समाज आणि कुटुंबातील पुरुषांचे स्थान, महत्व आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने पुरुषांच्या समस्या, आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच पुरुषांविरोधात होत असलेल्या अन्यायकारक गोष्टींवर प्रकाश टाकला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व, इतिहास आणि यंदाची थीम नेमकी काय आहे जाणून घेऊया.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन का साजरा केला जातो? (Why Celebrate International Men’sDay )
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश समाज, कुटुंब आणि समुदायामध्ये पुरुषांच्या अमूल्य योगदानाचा आदर करणे, त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पुरुषांसमोरील आव्हाने अधोरेखित करणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्याबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्याची सुरुवात कशी झाली? (Happy International Men’s Day 2024)
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्याची मागणी १९२३ साली करण्यात आली. मात्र, हा दिवस पहिल्यांदा १९९९ रोजी साजरा करण्यात आला. त्या वर्षी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम टेलक्सिंग यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ प्रथम आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला, यानिमित्ताने पुरुषांच्या समस्या मांडण्यासाठी लोकांना एकत्र केले.यानंतर काही वर्षांतच १९ नोव्हेंबर ही तारीख हळूहळू जगभर लोकप्रिय होऊ लागली.
जर आपण भारताबद्दल बोलायचे झाल्यास, आपल्या देशात पहिल्यांदा १९ नोव्हेंबर २००७ रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2024 थीम (international men’s day 2024 theme in india)
यावर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यासाठी एक विशेष थीम निश्चित करण्यात आली आहे. यंदाची थीम ‘पॉझिटिव्ह मेल रोल मॉडेल्स’ अशी निश्चित करण्यात आली आहे. समुदायासाठी सकारात्मक योगदान देणाऱ्या पुरुषांचा सन्मान करणे हा या थीमचा उद्देश आहे.
हेही वाचा – मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा? जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत
तुम्ही आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कसा साजरा करू शकता?
१) जागरूकता निर्माण करणे: तुम्ही तुमचे मित्र, कुटुंब आणि समाजातील लोकांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाबद्दल माहिती देत जनजागृती करू शकता.
२) कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा: तुम्ही तुमच्या परिसरात खास पुरुषांसाठी कार्यक्रम आयोजित करत त्यात सहभागी होऊन हा दिवस साजरा करू शकता.
३) स्वयंसेवक: पुरुषांच्या समस्यांवर काम करणाऱ्या संस्थेत तुम्ही स्वयंसेवक होऊ शकता.