International Yoga Day 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सातव्या योगदिनानिमित्त देशातील जतनेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांनी करोना कालावधीत योग अभ्यासाचे महत्व वाढल्याचं मत व्यक्त केलं. तसेच आजपासून संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने जगभरातील लोकांसाठी नवीन अ‍ॅप सुरु करणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. एमयोगा असं या अ‍ॅपचं नाव असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भारताने आज योगप्रसारासाठी संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आता जगभरातील लोकांना एमयोगा अ‍ॅपची शक्ती मिळणार आहे. या अ‍ॅपमध्ये कॉम योग प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षणाने अनेक व्हिडीओ जगभरातील वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असतील. हे अ‍ॅप म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन विज्ञानाच्या फ्युजनचे उत्तम उदाहरण असेल. मला पूर्ण विश्वास आहे की एम योगा अ‍ॅप जगभरामध्ये योग प्रसाराचं काम करण्यासाठी तसेच वन वर्ल्ड वन हेल्थ या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल,” असा विश्वास पंतप्रधान मोदींनी या अ‍ॅपची घोषणा करताना व्यक्त केला.

नक्की वाचा >> समजून घ्या : २१ जून रोजीच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिन?

करोना कालावधीमध्ये योगाचं महत्व वाढलं…

पंतप्रधान मोदींनी करोना कालावधीमध्ये योग अभ्यासाचे महत्व वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. “आज जेव्हा संपूर्ण जग करोनाशी लढत आहे तेव्हा योगा लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योग दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. करोना असतानाही यंदाच्या योग दिनाच्या ‘योगा फॉर वेलनेस’ या थीमने कोट्यावधी लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे,” असं पंतप्रधान म्हणाले.

नक्की पाहा >> Yoga Day 2021: योग अभ्यासाला सुरुवात कशी आणि कुठून करायची या गोंधळात असाल तर हे Videos पाहाच

करोना संकटात जगभरातील लोकांनी योगाची निवड केली…

प्रत्येक देश, समाज निरोगी राहावा अशी इच्छा व्यक्त करतानाच मोदींनी जगभरातील लोकांना एकमेकांची ताकद बनण्याची गरज असल्याचं आवाहन केलं. योगाने संयमाची शिकवण दिली असल्याचंही यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं. “गेल्या दीड वर्षात अनेक देशांनी करोनाच्या संकटाचा सामना केला आहे. या संकटाच्या कालावधीमध्ये लोक योगाला विसरु शकत होते पण त्याउलट लोकांमध्ये योगासंदर्भातील उत्साह, प्रेम अजून वाढलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अनेकांनी योगाला सुरुवात केली आहे,” असं मोदी म्हणाले.

नक्की वाचा >> Yoga Day 2021: जीमला जाण्याचा कंटाळा येतो? मग घरीच रोज ही तीन योगासनं करा आणि तंदरुस्त राहा

करोनाविरुद्ध लढण्यासाठी केला वापर…

“करोनाच्या अदृश्य व्हायरसने जगात धडक दिली तेव्हा कोणताही देश संसाधनं तसंच मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हता. अशा कठीण काळात आत्मशक्ती महत्वाचा मार्ग ठरला. मी आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलतो तेव्हा योगाचा त्यांनी सुरक्षा कवचाप्रमाणे वापर केल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी स्वत: आणि रुग्णांसाठी योगाचा वापर केला. आजारातून बाहेर पडल्यानंरही योगा महत्वाचा आहे,” असं मोदींनी यावेळी सांगितलं. तसेच अनेक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांकडून योग अभ्यास करुन घेत असल्याबद्दल मोदींनी समाधान व्यक्त केलं.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International yoga day 2021 myoga app to be launched worldwide says pm modi scsg