International Day of Yoga 2023: सध्या बदलत्या आणि वेगवान जीवनशैलीमुळे तणाव आणि चिंता या समस्या सामान्य बनल्या आहेत. मात्र या समस्यांचा आपल्या झोपेवर खूप परिणाम होतो आणि झोप पूर्ण झाली नाही तर शरीराशी संबंधित समस्या उद्भवतात. झोप हा आपल्या आरोग्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठीचा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक असते. आपण २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन २०२३ साजरा करणार आहोत. या योगदिनाच्या निमित्ताने आपण अशी काही योगासने जाणून घेऊयात ज्यामुळे शरीराला विश्रांती, मनाला शांती आणि झोपेची गुणवत्ता वाढू शकते.
बालासन –
बालासन, किंवा लहान मुलांची पोझ, हे असे योगासन आहे जे पाठ, खांदे आणि मानेवरील ताण कमी करण्यास मदत करते. हे तुम्हाला विश्रांती देण्यासह तुमचा तणाव आणि चिंता कमी करते. हे आसन कसे करायचे ते जाणून घेऊया.
- योगा मॅटवर गुडघ्यांवर बसा.
- दोन्ही पायाचे तळवे आणि टाचांना एकत्रित आणा.
- हळूहळू गुडघे शक्य तितके पसरवा.
- दीर्घ श्वास घ्या आणि पुढे झुका.
- दोन्ही मांड्यांवर पोट घ्या आणि श्वास सोडा.
हेही वाचा- International Yoga Day 2023: यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आणि योग करण्याचे फायदे जाणून घ्या
विपरित करणी आसन –
विपरित करणी आसन पोटाशी संबंधित समस्यांमुळे कधी-कधी झोप येत नाही. अशा वेळी हे योगासन केल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच ते तुमचा थकवा दूर करण्यासही मदत करते. या योगासनामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शिवाय ते तुमच्या पायांमध्ये द्रव जमा होणेदेखील कमी करते. हे आसन कसे करायचे जाणून घ्या.
असे करा विपरित करणी आसन –
- जमिनीवर किंवा योग मॅटवर झोपून हळूहळू दोन्ही पाय भिंतीच्या दिशेने वर करा.
- यावेळी तुमच्या दोन्ही हातांनी कमरेला आधार देण्याचा प्रयत्न करा.
- पाय आणि पायांची बोटं ही सरळ व ताठ राहतील याची काळजी घ्या.
- या स्थितीत डोळे बंद करा, शरीर स्थिर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या.
- श्वासांवर लक्ष केंद्रित करून५ ते १० मिनिटे या पोझमध्ये थांबा
सुप्त बद्ध कोनासन –
सुप्त बद्ध कोनासन योग, ज्याला रीक्लिनिंग बाउंड अँगल पोज म्हणून देखील ओळखले जाते, ही एक योग मुद्रा आहे, ज्यामध्ये तुमच्या पाठीवर झोपताना तुमचे गुडघे बाहेर पडू देताना तुमच्या पायाचे तळवे एकत्र आणले जातात. या योगासनाचे मन, शरीरासाठी असंख्य फायदे आहेत असे मानले जाते. तुमचा थकवा दूर करण्यासाठी हे खूप उपयोगी आसन आहे.
- गुडघे वाकवून पाठीवर झोपा.
- तुमच्या पायाचे तळवे एकत्र आणा, तुमचे गुडघे बाहेरच्या बाजूला सोडा.
- आपले हात आपल्या पोटावर किंवा आपल्या शरीराच्या बाजूला ठेवा, तळवे वरच्या दिशेने ठेवा.
- डोळे बंद करा आणि हळू, दिर्घ श्वास घ्या.
- ५ ते १० मिनिटे या स्थितीत रहा, हळूहळू सरावाने त्याचा कालावधी वाढवा.
सवासन –
सवासन, किंवा प्रेत मुद्रा, एक उत्कृष्ट योगासन आहे जे तुम्हाला दिर्घ विश्रांती देण्यासह मन शांत करण्यास, चिंता कमी करण्यास तसेच शांततेची स्थिती निर्माण करण्यास मदत करते.
असे करा सवासन –
- तुमचे पायांमध्ये अंतर ठेवून जमिनीवर झोपा आणि तुमचे हात तुमच्या शरीराच्या बाजूला ठेवा.
- डोळे बंद करा आणि श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रीत करा.
- शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे ध्यान केंद्रीत करा, शरीराचा प्रत्येक भाग आरामशीर आणि तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा
- तुमचे मन शांत होऊ द्या आणि कोणताही ताण किंवा तणाव घेऊ नका.
- सवासनाच्या स्थितीत १० ते १५ मिनिटं पडून राहा. संथ, स्थिर श्वासावर लक्ष केंद्रित करा.