Intestine Disorder Signs In Body, Gut Health: धावपळीचं आयुष्य जगणाऱ्या विशेषतः वारंवार प्रवास करणाऱ्या मंडळींना अनेकदा खाण्यापिण्याचे भान बाळगता येत नाही. खाण्याच्या वेळा, पदार्थ यावर अनेकदा आपले नियंत्रण नसते. त्यामुळेच हळूहळू पोटाचे, पचनाचे विकार डोके वर काढू लागतात. वयाच्या तिशीनंतर आतड्यांसंबंधी आजारांचा त्रास होण्याची शक्यता वाढते. अर्थात जोपर्यंत आपल्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा थेट प्रभाव दिसत नाही आपण या लक्षणांकडे दुर्लक्षच करतो. आज आपण अशाच काही दुर्लक्षित लक्षणांची माहिती करून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला आतड्याच्या विकाराचा धोका ओळखता येऊ शकतो. ट्रूनॉर्थ हेल्थकेअरचे सह-संस्थापक, साहिल सामरा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, सतत गॅस, छातीत जळजळ होणे, बद्धकोष्ठता आणि अतिसार ही आतड्यांच्या विकाराची प्रमुख लक्षणे असू शकतात. याशिवाय अन्य कोणत्या लक्षणांकडे आपण नीट लक्ष द्यायला हवे हे पाहूया..

आतड्याच्या विकाराचा धोका कसा ओळखाल? (How To Identify Gut Health Disorder)

वजन विनाकारण कमी किंवा जास्त होणे

वजन कमी करण्याचा प्रचंड प्रयत्न करूनही तुमचं वजन वाढतच असेल तर कदाचित हे आतड्याच्या विकाराचे लक्षण असू शकते. आतड्यातील बिघाड हे आपल्या शरीरात पोषक सत्वांचे शोषण होण्यास अडथळा निर्माण करू शकतात. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होणे, शरीरात नुकसानदायक फॅट्स जमा होणे असेही त्रास यामुळे वाढू शकतात. परिणामी सक्रिय जीवनशैली असूनही वजन कमी होत नाही.

हेही वाचा… Homemade oil for hair growth: शाहिद कपूरची बायको मीरा राजपूत सांगतेय, सुंदर आणि मजबूत केसांसाठी ‘हे’ खास तेल; एकदा नक्की ट्राय करून बघा

जाणीवपूर्वक प्रयत्न करूनही वजन वाढण्यामागे किंवा न वाढण्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे आतड्याची क्षमता कमी होणे. आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंची कार्यक्षमता कमी झाल्याने पचनाचा वेग मंदावतो परिणामी आवश्यक पोषक सत्वांचे शरीरात नीट शोषण होत नाही. यामुळे कुपोषण व वजन कमी होणे अशा समस्या वाढू शकतात.

झोप न लागणे

आतड्याचं आरोग्य बिघडल्यास त्याचा तुमच्या झोपेवरदेखील परिणाम होऊ शकतो. नीट झोप न झाल्याने थकवा जाणवतो. मूड सुधारण्यास कारणीभूत असणारा किंवा आपल्याला आनंदी ठेवणारा हार्मोन ‘सेरोटोनिन’ याचे ९० टक्के उत्पादन हे आतड्यांमध्ये होत असते. आतड्यांमधील बिघाडामुळे किंवा चांगल्या बॅक्टरीयाच्या अकार्यक्षमतेमुळे मूडवर व झोपेवर परिणाम होऊ लागतो.

वारंवर पोट बिघडणे

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की सतत थकवा जाणवणाऱ्या व्यक्तींना अनेकदा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (पोट नीट स्वच्छ न होणे) हा त्रास असतो. त्यामुळे जर आपल्याला काम न करता किंवा पुरेसा आराम करूनही सतत थकल्यासारखे वाटत असेल तर हे आतड्यांच्या बिघाडाचे लक्षण असू शकते. याशिवाय मळमळ, अतिसार, गॅस आणि ओटीपोटात दुखणे यांसारखी लक्षणे देखील उद्भवू शकतात.

गोंधळ, विस्मरण, लक्ष केंद्रित न होणे

तुमचे आतडे आणि मेंदू हे न्यूरोलॉजिकल मार्गांद्वारे जोडलेले असतात.त्यामुळे आपल्याला निर्णय घेताना सतत गोंधळ होणे, गोष्टी, वस्तू लक्षात न राहणे असे त्रास होत असतील किंवा एकाग्रतेने काम करता येत नसेल तर याचाही संबंध आतड्यांच्या विकाराशी (Gut Health) असू शकतो.

वारंवार त्वचेची अ‍ॅलर्जी

आतड्यांसाठी आवश्यक अशा बॅक्टरीयाचे प्रमाण कमी झाल्यास याचा प्रभाव आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर सुद्धा होतो. त्वचेवर याची काही लक्षणे दिसून येतात. अगदी मुरूम येणे, चट्टे उठणे आणि सोरायसिस सारखे त्रास वाढणे हे सुद्धा आतड्यांच्या बिघाडाचे लक्षण आहे. काही वेळा एखाद्या खाद्यपदार्थाची आपल्याला अ‍ॅलर्जी असेल तरी असा त्रास होऊ शकतो पण ते ही कारण नसेल तर कदाचित आतड्यांची क्षमता कमी होत आहे असे म्हणता येईल.

वारंवार डोकेदुखी

काही अभ्यासांमध्ये, वारंवार डोकेदुखी आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर यांचा एकमेकांशी संबंध असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार मायग्रेनचा त्रास होत असेल. मळमळ आणि उलट्या होत असतील तर तुम्ही तुमच्या आतड्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे.

वरील लक्षणे आपल्याला वारंवार आढळत असतील तर वेळीच आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे हेच हिताचे ठरू शकते.

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या)