सरळ वळण
दरमहा जितके पैसे येतात, त्यातले बरेचसे गुंतवणुकीच्या छोटय़ा-मोठय़ा बरण्यांमध्ये लुप्त होत असताना जरा वाईट वाटतं. पण ही सगळी खटपट आयुष्याचा गाडा सुरळीत हाकण्यासाठीच असते, याची जाणीव तो गाडा अडखळला की मगच होते.

गुंतवणूक हा नावाप्रमाणेच गुंतागुंतीचा विषय आहे. हा गुंता कधी सुरू झाला हे कळायच्या आतच आपण त्यात गुंतलेले असतो. भावनिक गुंतवणूक हा एक वेगळा प्रांत झाला. पण इथं जो विषय सुरू आहे तो आहे आर्थिक गुंतवणुकीचा. मुळात जन्माला आल्या आल्या ज्याप्रमाणे एक आडनाव आपोआप लागतं, त्याचप्रमाणे त्या आडनावाची आणखी एक एफडीही काढली जात असावी. जन्माचा दाखला आणि त्या एफडीची पावती हे दोन्ही कागद म्हणजे मनुष्य जिवंत असून या ग्रहावर अस्तित्वात आहे याचाच पुरावा मानला जाऊ  शकतो. असो. थोडक्यात काय, तर काही कळायच्या आधीच आपल्या पडत्या काळाची सोय जन्मदाते करून ठेवत असतात. त्यांच्या दूरदृष्टीचे, जाणतेपणाचे मानावे तेवढे आभार कमीच. पण ही जी सोय आहे ती आपली आपण कशी काय जोपासायची याचं ज्ञान येण्यासाठी पावतीचा कागद जुना व्हायला लागतो.

वाढत्या वयासोबत कधी या पावत्या वाढत जातात तर कधी बँकेची खाती. व्यवहारज्ञान येईपर्यंत हे सगळे आर्थिक व्यवहार जन्मदातेच करीत असतात. आपल्या नावावर घेतलेले शेअर्स हे प्रकरण नेमकं काय आहे याची कल्पना मिसरूड फुटेपर्यंत काही येत नाही. आणि व्याजाची गणितं ही धक्के खाल्ल्याशिवाय कळत नाहीत. शाळेत शिकलेली आकडेमोड नसानसांमध्ये रुजण्यासाठी वेळ लागतो. अगदी कॉलेजात जायला लागल्यावरसुद्धा हा मामला गोंधळून टाकणारा असतो. कधीमधी छोटे-मोठे प्रयत्न सुरू असतात. वेबसाइट्सचं पेव फुटल्यानंतर एक व्हच्र्युअल शेअर बाजाराची वेबसाइट आली होती. त्यावर थेट पैशाचे व्यवहार न करता प्रशिक्षणासाठी शेअर्सची खरेदीविक्री करता यायची. कॉलेजात असताना हा प्रकार भारी वाटायचा. त्यामुळे त्याची प्रचंड क्रेझ होती. चार भिंतींच्या आड मिळालेल्या शिक्षणापेक्षा या आभासी विश्वाने दिलेले धडे खरे शिक्षण देऊ न गेले.

पण या गुंतवणुकीचे खरे प्रशिक्षण वर्ग सुरू झाले ते घडय़ाळाच्या काटय़ाला जुंपून घेतल्यानंतर. महिन्याअखेरीला येणाऱ्या लक्ष्मीचं नियोजन कसं करायचं, तिची वृद्धी कशी करायची हे जन्मदाते आणि काही नजीकच्या मित्रांकडूनच शिकायचं असतं. अर्थात त्यासाठी काही संस्थाही आहेत. पण आपुलकी आणि नि:स्वार्थ भावनेने मिळालेलं शिक्षण पवित्र असतं म्हणे (कोण म्हणे ते माहीत नाही). विमा, एसआयपी, म्युच्युअल फंड्स वगैरे कानाला भारी वाटणारे शब्द वापरात आणायची वेळ आली तेव्हा पंचाईत झाली. पीएफ, ईपीएफ, पीपीएफ यांसारख्या फकारान्त संकल्पना अंगवळणी पडण्यासाठी वेळप्रसंगी घरच्यांच्या शिकवण्याही लावल्या. पण कसंय ना, की पैसा खेळत ठेवण्यासाठी हे गुंतवणुकीचे खेळ करावे लागतात. बाकी आरडी, पोस्ट वगैरे प्रकार म्हणजे जादूचे कप्पे. लहानपणी कुणी नातलग आले की ते हाताच्या मुठीत दहा-विसाची, कधी कधी पन्नासाची नोट ठेवून द्यायचे. मग त्या नोटा वही-पुस्तकात, एखाद्या पाकिटात दडवून ठेवल्या जायच्या. कधी कधी एखाद्या विजारीच्या खिशात राहून जायच्या. आणि मग काही दिवसांनी, महिन्यांनी अचानक हाताला नोटा लागायच्या. कुठल्याशा जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे छोटी छोटी खुशियों की जमापूँजी ती हीच. तेव्हा होणारा आनंद हा आरडी, पोस्टसारख्या संकल्पनांमधून जिवंत राहिला आहे. बाकी मागे राहिलेलं बालपण म्हणजे मोडलेल्या एफडीसारखं आहे. असो.

टप्प्याटप्प्याने माणूस या प्रांतात तरबेज व्हायला लागतो तसतसा त्याचा आत्मविश्वास वाढू लागतो. हे एसआयपी, फंड्स वगैरे म्हणजे बालवाडीतल्या संकल्पना वाटायला लागतात. भविष्याचा विचार करताना ते जर का सुदृढ, सशक्त आणि तब्येतीत रंगवायचं असेल तर मग गुंतवणूकही तशीच बलवान लागते असा कानमंत्र आप्तेष्ट देतात. आणि मग मोर्चा सोनं, चांदी, रिअल इस्टेटकडे वळायला लागतो. तसं तर सोन्याचांदीमधली गुंतवणूक हीदेखील टँहँऽऽऽ सोबतच होत असते. करगोटी, वळे इथून सुरू होत होत भिकबाळीमार्गे सोन्याची साखळी तयार होत असते. पण स्वत:हून स्वत:च्या पैशांनी जेव्हा सोने खरेदी होते तेव्हा मात्र बराच विचारविमर्श होतो. मुळात सोन्यामधली गुंतवणूक हा प्रकार मुलांना (यामध्ये कुठेही लिंगभेद करायचा उद्देश नाही. कृपया भावना दुखावून घेऊ  नयेत.) कळायला जरा उशीर लागतो. अर्थात हा नियम काही सरसकट लागू होत नाही. पण आपल्याकडे सोनं म्हणजे मुलींचा प्रांत आणि रिअल इस्टेट म्हणजे मुलांचा अशी अलिखित विभागणी करून ठेवलेली असते. या समजाला छेद देत दोन्हीकडे व्यापारी माल या नजरेने जो पाहतो तोचि साधू ओळखावा.

दहावीला भूमितीच्या पेपरात चार विभाग असायचे. सुरुवातीचे दोन विभाग बऱ्यापैकी सोपे असायचे. सी आणि डी विभागतल्या आकृत्या मात्र डोकं फिरवणाऱ्या असायच्या. त्यांची क्षेत्रफळं, परिमिती, कोनाचे अंश काढता काढता मेंदूच्या त्रिज्येचा भोज्जा उडालेला असायचा. रिअल इस्टेटमधली गुंतवणूक म्हणजे हे सी आणि डी विभाग. या विभागातले प्रश्न सोडवावे तर लागतातच. नाहीतर गुणांचं क्षेत्रफळ कमी भरतं. पण ते सोडवण्यासाठी बरीच डोकेफोड करावी लागते. घर घेतानाची धावाधाव आणि तडफड ही तशीच काहीशी असते. त्यात पुन्हा मुलांचं लग्न वगैरे व्हायचं असेल तर ही गुंतवणूक म्हणजे असलीच पाहिजे असा काहीसा समज. लाडवांचा मोठा डबा भरताना इतर लहानसहान डब्यांमधले लाडू जसे योगदान देतात तसे मग आरडी, शेअर्स, एफडी, सोनं वगैरे एकत्रित येऊन एक रक्कम उभी करतात. आणि मग त्या रकमेसह कर्ज नावाच्या भुताला अगत्याचं निमंत्रण पाठवलं जातं. हे सगळे सोपस्कार पार पडले की मग हफ्त्याच्या अक्षता दर महिन्याला पडायला लागतात. जोपर्यंत घराचे हप्ते सुरू होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने गुंतवणूक होत नसते असं म्हणतात (हे असं कोण म्हणतं काय माहीत. जे कुणी हे असं सगळं ‘म्हणे’वाले आहेत त्यांना विशेष नैपुण्य पुरस्कारच बहाल केला पाहिजे.) मध्यंतरी बिटकॉइनला चमक आली तेव्हा नाक्यावर चर्चेला उधाण आलं होतं. या नवीन प्रकारामध्येही थोडी घुसखोरी करावी म्हणून अनेकजण प्रयत्न करत होते. पण मग नंतर या गुंतवणुकीमधला धोका लक्षात आल्यावर अनेकांनी माघार घेतली.

मुळातच गुंतवणूक हा प्रकारच धोका पत्करण्याचाच मार्ग असतो. फक्त हा धोका नियोजनपूर्ण धोका, म्हणजे ज्याला इंग्रजीत कॅलक्युलेटेड रिस्क म्हणतात, असा असतो. कमवलेल्या पैशाचा योग्य रीतीने विनियोग होत असतानाच त्याची वाढ कशी करायची हे योग्य वयात कळणंच गरजेचं असतं. म्हणूनच नोकरीला लागलं रे लागलं की घरचे कसले कसले फॉर्मस् भरायला देतात. त्यावर सह्या करताना कटकट वाटत असते. दरमहा जितके पैसे येतात, त्यातले बरेचसे हे छोटय़ा-मोठय़ा बरण्यांमध्ये लुप्त होत असताना जरा वाईट वाटतं. पण ही सगळी खटपट ही आयुष्याचा गाडा सुरळीत हाकण्यासाठीच असते, याची जाणीव तो गाडा अडखळला की मगच होते. त्यामुळे आरोग्याचा विमा असो, की एसआयपीचे हप्ते असोत, हा गुंता जितका मोठा तितका चांगला. कारण प्रपंचात उद्भवणारे बरेचसे प्रश्न अनेकदा हा गुंताच सोडवत असतो.
पुष्कर सामंत – response.lokprabha@expressindia.com / @pushkar_samant
सौजन्य – लोकप्रभा

Story img Loader