आसिफ बागवान
अॅपलचा आयफोन म्हटलं की, सर्वसामान्य ग्राहकाच्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येते ती त्याची किंमत. अॅण्ड्रॉइडचे फोन अगदी सहा-सात हजार रुपयांना मिळत असताना अॅपलचे बाजारात येणारे नवनवे आयफोन ५०-६० हजार रुपयांपेक्षाही अधिक किमतीचे असतात. त्यामुळे आयफोन म्हटलं की त्याची वैशिष्टय़े, दर्जा, उपयुक्तता या गोष्टींचे मूल्यांकन होण्याआधीच केवळ मूल्याकडे पाहून आयफोनकडे पाठ फिरवली जाते. अर्थात असे असले तरी, भारतात हटकून आयफोनच वापरणाऱ्यांचा एक समूह आता विस्तारत चालला आहे. अॅपलच्या नव्या आयफोनची प्रतीक्षा करणारा आणि बाजारात तो येताच त्यावर झेपावणारा ग्राहकवर्ग मर्यादित असला तरी, नव्या आयफोनच्या आगमनासोबत कमी होणाऱ्या आयफोनच्या आधीच्या आवृत्त्यांमधील आयफोनकडे डोळे लावून बसणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. आयफोन आठ आला की आयफोन पाच, सहा खरेदी करायचा. दहा आला की सात, आठ मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे, हा सिलसिला केवळ भारतातच नव्हे तर जगभरात दिसून येतो. भारतातही तो कल रुजू लागला आहे. मात्र अशा ग्राहकांना अॅपलच्या तांत्रिक अद्यतनांसह नवीन आयफोनच उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने ‘आयफोन एसई’ बाजारात आणला आहे.
‘आयफोन एसई’ हे खरं तर अॅपलच्या नवव्या पिढीतील आयफोनचं नाव आहे. चार वर्षांपूर्वी २०१६ मध्ये अॅपलने ‘आयफोन एसई’ बाजारात आणला होता. आयफोन सहा या त्यासोबत आलेल्या महागडय़ा आयफोनला स्वस्तातला पर्याय म्हणून ‘आयफोन एसई’ बाजारात आणण्यात आला होता. त्याच ‘आयफोन एसई’ची दुसरी आवृत्ती असं या नव्या ‘आयफोन एसई’ला म्हणता येईल. मात्र पहिली आवृत्ती आणि आताची आवृत्ती यामध्ये नावाखेरीज अजिबात संबंध नाही. अर्थात ‘आयफोन एसई’ आणण्यामागचं अॅपलचं गणित परवडणाऱ्या (?) किमतीत ग्राहकांना आयफोन उपलब्ध करून देणं हा आहे. ही परवडणारी किंमत सुरुवातीलाच सांगितलेली बरी. तर हा ‘आयफोन एसई’ भारतामध्ये ४२ हजार ५०० रुपयांना उपलब्ध आहे. एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून खरेदी केल्यास ‘कॅशबॅक’च्या लाभांसहित तो ३८ हजार ९०० रुपयांना मिळतो. या किमतीकडे पाहिल्यावर अनेकांनी मनातल्या मनात ‘आयफोन एसई’कडे पाठ फिरवली असेल. कारण इतक्या किमतीत अॅण्ड्रॉइडचे महागडे फ्लॅगशिप स्मार्टफोन मिळत असताना, ‘परवडणाऱ्या’ आयफोनची गरज काय, असा प्रश्न सहज मनात येऊ शकेल. मात्र हे मत बनवण्याआधी या फोनबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ‘आयफोन’ एकदा ज्याने वापरला त्याला नंतर कोणताही फोन भावत नाही, असं म्हणतात. याचं कारण असतं आयफोनचा गुणात्मक दर्जा, त्यातील नवनवीन वैशिष्टय़े, त्याला वेळोवेळी मिळणारं अॅपलचं तंत्रसाह्य़ आणि अॅपलची ग्राहकसेवा. आयफोन वापरत असल्यामुळे मिळणारी प्रतिष्ठा हा एक त्यातील भाग असेलच. पण त्याहीपेक्षा आयफोनमध्ये जपली जाणारी वापरकर्त्यांची सुरक्षितता आणि गोपनीयता, या गोष्टीही आयफोनला अॅण्ड्रॉइडपेक्षा अधिक गुणवान ठरवतात. ‘आयफोन एसई’ हाताळल्यानंतर वरील सर्व कारणांची पुरेपूर साक्ष पटते.
या फोनची प्रत्येक वैशिष्टय़े उलगडून सांगण्याची गरज नाही. कारण कोणत्याही आयफोनसारखीच या आयफोनची बाह्य़रचना आहे. पुढे व मागील बाजूस काचेचं आवरण असलेला हा आयफोन इतर आयफोनसारखाच दिसतो. बांधणीतही तो मजबूत वाटतो. फोन वजनाने हलका असला तरी त्यावरची पकड सहजासहजी सैल होत नाही. फोनची स्क्रीन ४.७ इंच आकाराची आहे. खरं तर सध्या अॅण्ड्रॉइड फोन सहा-साडेसहा इंच आकाराच्या डिस्प्लेचे मिळत असताना ४.७ इंच आकाराचा डिस्प्ले अपुरा वाटू शकतो. मात्र पूर्वीच्या ‘आयफोन एसई’शी साधम्र्य ठेवण्यासाठी म्हणून की काय अॅपलने नव्या आवृत्तीतही स्क्रीनचा आकार सेंटीमीटरनेही वाढवलेला नाही. हा डिस्प्ले छोटा असला तरी, त्यावरील दृश्यानुभव कुठेही कमी पडत नाही. या फोनवर गेमचे अॅप असोत की व्हिडीओ असोत, तुम्ही काहीही पाहिलं तरी तुम्हाला अतिशय चांगला दृश्यानुभव येईल.
सध्या बाजारात मिळणाऱ्या अन्य फोनच्या तुलनेत आयफोनला ‘मागास’ ठरवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, त्यातील कॅमेरा. बाजारात सध्या तीन-चार कॅमेरे मागे आणि दोन-दोन कॅमेरे पुढे असलेले आयफोन येत असताना ‘आयफोन एसई’मध्ये दोन्ही बाजूंना प्रत्येकी एकेक कॅमेराच आहे. ही बाब कदाचित आयफोन एसईला मागास ठरवू शकत असेल. मात्र या एका कॅमेऱ्यात तीन कॅमेऱ्यांच्या एकत्रित कामगिरीइतकी क्षमता आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ‘आयफोन एसई’मधील ‘ए१३ बायोनिक’ प्रोसेसर त्यातील कॅमेऱ्याला समृद्ध करतो. हा प्रोसेसरच ‘आयफोन एसई’चं सर्वात मोठं आणि शक्तिशाली वैशिष्टय़ आहे. आयफोन ११ आणि आयफोन ११ प्रो या अद्ययावत आयफोनच्या आवृत्त्यांमध्ये वापरण्यात येणारा हा प्रोसेसर स्मार्टफोनमधील आजवरचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर असल्याचा अॅपलचा दावा आहे. आयफोन एसईमधील कोणतेही अॅप वापरताना या प्रोसेसरच्या क्षमतेचा प्रत्यय आपल्याला येतो. या प्रोसेसरच्या मदतीनेच ‘एसई’चा एक कॅमेराही अतिशय उत्तम दर्जाची छायाचित्रे आणि व्हिडीओ टिपून देतो. पब्जी, कॉल ऑफ डय़ुटीसारखे शक्तिशाली गेमही या प्रोसेसरमुळे ‘आयफोन एसई’वर उत्तम कामगिरी करतात.
‘आयफोन एसई’मधील अन्य वैशिष्टय़े अॅपलच्या कोणत्याही आयफोनच्या तोडीस तोड आहेत. त्याबद्दल स्वतंत्रपणे सांगण्याची गरज नाही. मात्र या आयफोनमध्ये अॅपलने भारतीयांकरिता काही विशेष गोष्टी देऊ केल्या आहेत. अॅपलचे ‘व्हॉइस असिस्टंट’ असलेले ‘सिरी’ हे भारतीय इंग्रजी उच्चारांना अचूक प्रतिसाद देईल, या क्षमतेचे बनवण्यात आले आहे. तसेच या आयफोनमधील ऑपरेटिंग सिस्टीम ‘आयओएस १३’ आता मराठीसह २२ भारतीय भाषांना आधार देते. या फोनमधील कीबोर्डवरील हिंदी, इंग्रजी टायपिंग अधिक सुलभ करण्यात आले असून विविध भाषांकरिता आकर्षक फॉण्टदेखील त्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
‘आयफोन एसई’ची ४२ हजार रुपये ही किंमत सर्वसामान्य भारतीय ग्राहकांच्या दृष्टीने जास्तच आहे. मात्र आयफोनचे चाहते झालेल्या एका ठरावीक भारतीय ग्राहकवर्गासाठी हा फोन एक उत्तम पर्याय आहे. अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनमधील बेढब थिम्स, सुरक्षिततेचा अभाव या गोष्टींना कंटाळलेल्यांसाठी ‘आयफोन एसई’ उपयुक्त ठरू शकते. दिवसेंदिवस स्मार्टफोनचा वाढत चाललेला आकार पसंत नसलेल्यांकरिताही हा फोन योग्य ठरू शकतो.