भारतीय संशोधकाचा समावेश असलेल्या एका शास्त्रज्ञांच्या चमूने कमी किमतीत उपलब्ध होणारी रक्तचाचणी विकसित केली असून, त्यामुळे केवळ १५ मिनिटांमध्ये लोह आणि जीवनसत्त्व ‘अ’ ची कमतरता तपासता येणार आहे.
लहान, सहज हातातून नेण्यासारखी ही निदानसूचक प्रणाली लंचबॉक्सच्या आकारातील असून, यामध्ये रक्तचाचणी पट्टी आहे. मधुमेहाची तपासणी करतात, त्याप्रमाणेच ही चाचणी आहे. जीनवसत्त्व ‘अ’ आणि लोहाची कमतरता जागतिक लोकसंख्येसमोर मोठा प्रश्न आाहे. जगातील एकतृतीयांशपेक्षा अधिक लोकांमध्ये जीनवसत्त्व ‘अ’ आणि लोहाची कमतरता आहे. यांच्या कमतरतेमुळे अंधत्व, अॅनेमिया (रक्तातील तांबडय़ा पेशींची कमतरता) आणि मृत्यूही येऊ शकतो. विशेषत: लहान मुले आणि स्त्रियांमध्ये याचा मोठय़ा प्रमाणात अभाव जाणवतो. ही आरोग्याची मोठी समस्या असल्याचे, अमेरिकेतील कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे साहाय्यक प्राध्यापक सौरभ मेहता यांनी सांगितले.
डॉक्टरांनी पोषक घटकांची कमतरता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या घटकांची कमतरता आहे हे प्राथमिक स्तरावर कळण्यास अवघड जाते. त्याचा शरीरावर मोठा प्रभाव पडतो, असे पीएनएएस या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाचे वरिष्ठ लेखक मेहता म्हणाले.
सर्व विकसनशील देशांकडे प्राथमिक स्तरावर रोगनिदान करण्यास आवश्यक असणारी अत्याधुनिक साधणे अपुरी आहेत. ही समस्या दूर करण्याची क्षमता या चाचणीमध्ये आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, लहान वयातील २५० दशलक्ष मुलांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ची कमतरता आहे. ज्या भागांमध्ये लहान मुले आणि गर्भवती महिलांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ची कमतरता आहे, त्या ठिकाणी प्राथमिक तपासणीसाठी ही चाचणी अतिशय फायदेशीर ठरू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. दरवर्षी जवळपास पाच लाख मुले जीवनसत्त्व ‘अ’ च्या कमतरतेमुळे अंध होतात. आणि त्यातील निम्मी मुले वर्षभरात इतर आजार होऊन मृत्यू पावतात, असे त्यांनी सांगितले.