पालक हो, कृपया ही बाब नोंद करा! ज्या मुलांच्या झोपेच्या वेळा अनिश्चित आहेत त्या मुलांच्या वागण्यामध्ये प्रचंड बदल होत असल्याचे एका अभ्यासामधून समोर आले आहे.
झोपेच्या अनियमित वेळांमुळे मुलांच्या शरीराची नैसर्गिक लय बिघडून निद्रानाश होतो. निद्रानाशामुळे मुलांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होवून बागण्यामध्ये प्रचंड बदल होत असल्याचा दावा युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या(यूसीएल) संशोधकांनी केला आहे.
“झोपेची एक निश्चित वेळ ठरलेली नसल्यामुळे मुलांच्या शरिरातील नैसर्गीक क्रिया मंदावून शरिराच्या व मेंदूच्या विकासावर परिणाम होतो. त्यामुळे मुलांच्या वागण्यामध्ये प्रचंड बदल होतात. लहान वयातील मुलांच्या मेंदूच्या आणि शरिराच्या विकासावरच त्यांचे उत्तर आयुष्य अवलंबून असते हे आपल्याला माहितच आहे. मुलांच्या लहान वयातील पालन-पोषणाचा परिणाम आयुष्याभरातील आरोग्यावर होत असतो. यामध्ये झोपेला खूप महत्त्व आहे. मुलांना शारिरीक विकासाच्या काळामध्ये निद्रानाशाला सामोरे जावे लागल्याचा सरळ परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यातील आरोग्यावर होतो,” असे ‘यूसीएल’च्या आरोग्य विज्ञान विभागाचे प्राध्यापक यहोनी केली म्हणाले.  
संशोधकांनी अभ्यासासाठी तीन, पाच आणि सात वयोगटातील १०,००० मुलांच्या झोपेच्या वेळा व त्याचा होणारा परिणाम याबद्दल माहिती मिळवली. या माहिती बरोबर या मुलांच्या पालकांकडून व शाळेतील शिक्षकांकडून या मुलांच्या वागण्यासंदर्भात माहिती गोळा केली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर संशोधकांनी मुलांच्या झोपेच्या अनिश्चिततेमुळे मुलांच्या वागण्यावर हेणाऱ्या परिणामांविषयी निष्कर्ष नोंदवले आहेत.
मात्र, निरिक्षण करण्यात आलेल्या ज्या मुलांनी झोपेची एक निश्चित वेळ ठरवली त्या मुलांच्या वागण्यामध्ये व आरोग्यामध्ये सुधारणा होत असल्याचे यहोनी केली यांनी सांगितले.        

Story img Loader