सध्या जगभरात कॅन्सर आजाराचा विळखा वाढत चालला असून चिंतेचा विषय ठरत आहे. कोणताही उपचार किंवा औषध कॅन्सर पूर्णपणे बरा करण्याची खात्री देत नाही. मात्र इस्त्राईलमधील एका बायोटेक कंपनीने कॅन्सर मुळापासून नष्ट करण्याचा पर्याय सापडला असून 2020 पर्यंत आपण हे औषध बाजारात आणणार असल्याचा दावा केला आहे.
सध्या कॅन्सरवर वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारपद्धती उपलब्ध आहेत. पण कोणताही उपचार 100 टक्के कॅन्सर बरा करण्याची हमी देत नाही. पण 2000 साली स्थापन झालेल्या अॅक्सिलरेटेड इवोल्यूशन बायोटेक्नॉलॉजी लिमिटेडने कॅन्सर पूर्णपणे बरा करणारं औषध सापडल्याचा दावा केला आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंपनीचे चेअरमन अॅरिडोर यांनी ही उपचारपद्धती पहिल्या दिवसापासून कॅन्सरवर प्रभाव करण्यास सुरुवात करेल अशी माहिती दिली आहे. यासोबतच औषधामुळे दुसरा कोणताही त्रास होणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत. सध्या उपलब्ध असणाऱ्या उपचारांशी तुलना करता याची किंमत फार कमी आणि परवडणारी असेल असंही त्यांनी सांगितलं आहे.
कंपनीने या उपचारपद्धतीला MuTaTo म्हणजेच मल्टी टार्गेट टॉक्सिन असं नाव दिलं आहे. कंपनीचे सीईओ डॉ इलान मोराद यांनी सांगितल्यानुसार, आम्ही सध्या बाजारात उपलब्ध असलेली औषधं आणि उपचारपद्धती कॅन्सरवर प्रभावी का ठरत नाही आहेत याच्या कारणांचा शोध घेतला असता आम्हाला हा पर्याय सापडला. कंपनी लवकरच या औषधांची चाचणी करणार आहे. पुढील वर्षापर्यंत हे औषध बाजारात आणण्याचा प्रयत्न असणार आहे.