अजिबात न खाता आणि भरपूर व्यायाम करुनही वजन कमी होत नाही अशी तक्रार सध्या अनेक जण करताना दिसतात. पण यामागे नक्कीच काहीतरी कारण असायला असून त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. व्यक्तीचे वजन वाढते किंवा वाढलेले वजन कमी होत नाही तेव्हा खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने बाहेर जात नाही. अशाप्रकारे व्यक्तीचे वजन उतरत नसेल तर त्याच्याकडून काहीतरी खाल्ले जाते जे लक्षात येत नाही हे नक्की. अशावेळी ‘हवा खाल्ली तरी माझे वजन वाढते, माझे पाय आपोआप वडापाव किंवा पाणीपुरीच्या गाडीकडे वळतात’, असे वाकप्रचार केले जातात. पण मधल्या वेळात जे खाल्ले जाते ते अनेकांच्या लक्षात येत नाही.
याबरोबरच दगदग आणि व्यायाम यांतील फरक आपल्याला कळत नाही. जर कोणत्याही अॅक्टीव्हीटीमध्ये मन फ्रेश झाले आणि शरीर थकले तरच तो व्यायाम आहे. पण शरीर न थकता मन थकले तर किंवा शरीर आणि मन दोन्ही थकले तर ती दगदग आहे हे आपण समजून घ्यायला हवे. मुंबईसारख्या शहरांत बराच काळ प्रवास, स्टेशनपासून ऑफीस किंवा घरापर्यंत चालत जाणे यांमुळे थकवा येतो. पण हा व्यायाम नसून त्यावेळी डोक्यात विचार असल्याने मन थकते. त्यामुळे व्यायाम हा वेगळे महत्त्व देऊन, त्यासाठी वेगळा वेळ काढून करायची गोष्ट आहे. जो व्यायाम केल्यानंतर मन आनंदी होईल आणि शरीर थकेल तोच खरा व्यायाम.
आपण नक्की किती खातो हे आपल्याला माहिती असेल तर तुम्ही वाढणाऱ्या वजनावर नक्की नियंत्रण मिळवू शकता. आपली भूक किती आणि पोटाची गरज किती हे प्रत्येकाला उपजत कळत असते. ती भूक ओळखून आपण आपला आहार ठरवायला हवा. त्यामुळे व्यायाम करुनही आणि न खाऊनही वजन कमी होत नाही हा गैरसमज नक्कीच दूर होण्यास मदत होईल.