कोणताही सण म्हटला कि त्या दिवशी खास पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे खाद्यपदार्थ हे आलेच. त्याशिवाय तो दिवस पूर्णच होऊ शकत नाही. कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीचा सण आणि दुधाच्या पदार्थांपासून बनणारे विविध खाद्यपदार्थ हे देखील असंच अनोखं नातं आहे. असं म्हटलं जातं कि, या दिवशी श्रीकृष्णाचं दूध आणि दुधापासून बनणाऱ्या विविध पदार्थांवरील असलेलं विशेष प्रेम आणि आवड लक्षात घेऊन काही अत्यंत स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. आपल्याकडे विशेषतः ‘कृष्णजन्माष्टमी’ सोहळ्याला ‘सुंठवडा’ हा प्रसाद म्हणून बनवला जातो. तर दहीहंडीला गोपाळकाल्याचा नैवेद्य असतो. अर्थातच हे सर्व पदार्थ आपल्या शरीरासाठी देखील पौष्टिक आणि अत्यंत फायदेशीर असतात. दिवसभराच्या उपवासानंतर हे पदार्थ पोटाला आराम देणारे ठरतात. आज आपण असेचं काही पदार्थ जाणून घेणार आहोत
सुंठवडा
साहित्य : एक चमचा ओवा, दोन चमचे खोबऱ्याचा कीस, दोन चमचे धणे, एक चमचा तीळ, दोन इंच सुंठ तुकडा, पाच- सहा मिरी, तीन चमचे गूळ.
कृती : गूळ सोडून सर्व पदार्थ हलके वेगवेगळे भाजून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करावे. नंतर गूळ घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. प्रसादाचा सुंठवडा तयार!(काहीजणांकडे फक्त सुंठ खडीसाखर व सुकामेवा घालून ही करतात.)
गोपाळकाला
साहित्य : ज्वारीच्या लाह्या चार वाटय़ा, एक वाटी मुरमुरे, अर्धी वाटी जाड पोहे, अर्धी वाटी घट्ट दही, अर्धा लिंबू, एक चमचा साखर, दोन चमचा काकडीचा कीस, दोन चमचे गाजर कीस, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, दोन चमचे चिरलेली कोथिंबीर, एक चमचा साखर, अर्धा इंच आलं, एक मिरची, मीठ पाव चमचा, जिरे अर्धा चमचा, कढीपत्ता पाचसहा पाने, चिमूटभर हिंग, दोन चमचे तेल.
कृती : आलं, मिरची, दही, साखर, मीठ, लिंबाचा रस मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पोहे भाजून गार करावे. लाह्या पाण्याने धुऊन निथळत ठेवाव्या. एका मोठय़ा वाडग्यात लाह्या, शेंगदाणे, मुरमुरे, काकडी कीस, गाजर कीस, कोथिंबीर, पोहे एकत्र करून घ्यावेत. त्यात मिक्सरमध्ये एकजीव केलेले मिश्रण घालून नीट मिसळावं. जिरे, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करून वरून ओतावी. नीट एकजीव करून घ्यावी. गोपाळकाला तयार! लगेच खायला घ्यावा.
(यात लाह्या, दही, मुरमुरे मुख्य असून बाकी पदार्थ आवडीप्रमाणे कमी-जास्त करू शकतो. फळेही घालता येतात.)
‘कृष्णजन्माष्टमी’ आणि ‘दहीहंडी’च्या दिवशी या २ पदार्थांसह आणखीही काही पदार्थ बनविले जातात. ते देखील पाहुयात
खीर – दूध, सुकामेवा, तांदूळ, साबुदाणा या पदार्थांपासून बनवली जाणारी खीर ही या दिवसाचं वैशिष्ट्य मानलं जात. वेलची आणि केशराने तर या खिरीला आणखीच अप्रतिम चव येते. अत्यंत स्वादिष्ट अशी ही खीर श्रीकृष्णाला जन्माष्टमीच्या मध्यरात्री ‘छपन्न भोगांचा’ एक भाग म्हणून अर्पण केली जाते.
गोड दही – हा पदार्थ देखील श्रीकृष्णाचा आवडता मानला जातो. घरगुती ताजं लोणी, त्यात खडी साखर किंवा साखर घालून अगदी २ मिनिटांत बनणारं गोड दही बनतं हे आपल्या शरीरासाठी देखील उत्तम मानलं जातं.
दूध आणि मध – कृष्ण जन्माष्टमीची पूजा दूध आणि मधाने बनलेल्या पेयाशिवाय अपूर्ण ठरते असं मानलं जातं. दूध आणि मधाचं मिश्रण असलेलं हे पेय हे श्रीकृष्णाला अर्पण करून त्यानंतर सर्वांना तीर्थ म्हणून दिलं जातं.
पंचामृत – कृष्णजन्माष्टमीच्या उत्सवादरम्यान श्रीकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालण्यासाठी हे पंचामृत वापरलं जातं. हे मिश्रण ताजं दूध, दही, तूप, मध, साखर/गूळ, तुळशीची पानं यांपासून बनवलं जातं. मध्यरात्री कृष्णजन्माष्टमीची पूजा संपल्यानंतर हे पंचामृत सर्वांना तीर्थ म्हणून वाटलं जातं.