Shri Krishna Janmashtami 2022: यंदा १८ ऑगस्टला श्रावण महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. बालगोपाळ श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून ही तिथी हिंदू धर्मीयांमध्ये अत्यंत पवित्र मानली जाते. आपल्याकडे कोणताही सण असला की खास मेजवानीचा बेत असायलाच हवा. श्रीकृष्ण जन्माष्टमीला एक वेळ उपवास केले जाते व रात्री कान्हाला नैवेद्य दाखवून मग उपवास सोडला जातो. गोकुळाष्टमीला कोकणात आंबोळ्या, काळ्या वाटण्याचा रस्सा, शेवग्याची भाजी असा बेत केला जातो. यादिवशी उपवासाला भात खाणे वर्ज्य असते त्यामुळे तांदळाच्या पिठाच्या आंबोळ्या केल्या जातात.
आता आंबोळ्या हा जितका वाटतो तितका सोप्पा पदार्थ नाही, कमीत कमी सामग्री वापरून होणाऱ्या या आंबोळ्यांमध्ये साहित्याचं प्रमाण कमी अधिक झाल्यास बेत फसू शकतो. काहीवेळा तर पीठ चांगले आंबवले नाही तर तव्यावर पीठ पसरवताच येत नाही. विशेषतः पावसाळ्यात हवामान थंड असल्याने पीठ पटकन आंबत नाही. या सगळ्या प्रश्नांवर काही अस्सल गृहिणींच्या टिप्स आज आपण पाहणार आहोत. चला तर मग..
( हे ही वाचा: Krishna Janmashtami 2022: मोरपंख, लोणी ते बासुरी, यंदा जन्माष्टमीच्या आधी घरी आणा ‘या’ वस्तू; जाणून घ्या कसा होईल लाभ)
- आंबोळ्याचे पीठ बनवण्यासाठी तांदूळ निदान ८ तास आधी भिजवून ठेवावे, तसेच पीठ वाटून झाल्यावर सुद्धा ८ तास आंबण्यासाठी लागतात त्यामुळे तुम्हाला आजच प्रक्रिया सुरु करावी लागेल.
- आंबोळ्यांचे पीठ वाटताना सरसरीत वाटावे.
- आंबोळ्याच्या वाटपात थोडा शिजवलेला भात वाटून घेतल्यास मऊपणा येतो.
- आंबोळ्या पांढऱ्या शुभ्र करण्यासाठी वाटप करताना त्यात ओले खोबरे टाकावे.
- पीठ आंबवण्यासाठी वाटल्यावर लगेच मीठ व अगदी किंचित खाण्याचा सोडा घालावा.
- पीठ वाटताना त्यात थोडे भिजवलेले पोहे सुद्धा वाटून घ्यावे
- पीठ शक्यतो अल्युमिनियम च्या डब्यात ठेवावे यामुळे आंबवण्याची प्रक्रिया जलद होते
- पीठ वाटून झाल्यावर त्यात थोडे कोमट पाणी घालावे.
दरम्यान अनेकांना पीठ तव्याला चिकटण्याची समस्यां येते. यावर उपाय म्हणजे आपण बिड्याचा तवा वापरावा. हा तव थोडा जाड असल्याने पीठ चिकटत नाही. जितका जुना व वापरातील तवा असेल तेवढे उत्तम.
शक्यतो आंबोळ्या करताना तव्यावर पीठ टाकताना आधी कांद्याने तेल लावून घेतले जाते मात्र उपवासात कांदे वापरायचे नसल्याने आपण नारळाची शेंडी वापरून तेल लावून घ्यावे, यानंतर थोडे मीठ घातलेले पाणी शिंपडून मग पीठ तव्यावर घालावे