Jaswandi Gardening Hacks: जास्वंदाचं रोप घरी असावं असं सगळ्यांनाच वाटतं. श्रीगणेशाचं आवडतं फूल म्हणजे जास्वंद. घरी बाप्पाची पूजा करताना आपल्या बागेत फुललेलं एखादं तरी फूल चरणावर वाहावं अशी अनेकांची इच्छा असते. याच इच्छेपोटी आपण बाजारातून जास्वंदाच्या फुलांची रोपं आणतो, त्याला वेळोवेळी सूर्यप्रकाश व पाणी देऊन त्याची निगासुद्धा राखतो, रोप तुम्ही लावलेल्या लहानश्या कुंडीत बहरत जातं, त्याला अगदी टवटवीत पाने येतात, पण कळ्या? कळ्या मात्र काही केल्या येतच नाहीत. अशावेळी काय करावं हे आज आपण पाहणार आहोत. जास्वंदाच्या रोपाला वेगवेगळ्या पद्धतीची खते देणे खूप आवश्यक असते, यासाठी बाजारातून महाग सेंद्रिय खत किंवा केमिकल्स आणायची गरज नाही. पण, किचनमधील काही वस्तू वापरूनही काम पूर्ण करता येतं.
उन्हाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाची काळजी कशी घ्यायची जाणून घेऊ या… (Hibiscus Fertilizer)
जेव्हा बागेत कुंडीमध्ये आपण जास्वंद लावतो तेव्हा या झाडांना जरी भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवणे जरी आवश्यक असले तरी आता उन्हाळ्यामध्ये दुपारच्या कडक उन्हापासून या झाडाचे संरक्षण करावे कारण उन्हामुळे झाडावरची पाने करपल्यासारखी दिसतात त्याचबरोबर झाडावरची पाने उमलण्याआधीच गळायला सुरूवात होते. त्याचबरोबर झाडावरील उमललेल्या फुलांचा रंग फिका होतो त्यामुळे या झाडांना अशा ठिकाणी ठेवा जेथे त्यांना १२च्या आतील किंवा ४ नंतरचे ऊन मिळेल.
उन्हाळ्यामध्ये कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतपण पाणी देणे आवश्यक आहे. दररोज पाणी दिल्यामुळे झाडाच्या कुंडीतील माती सुकणार नाही. पाणी नेहमी सकाळ किंवा संध्याकाळीच द्यावे दुपारच्या वेळी देऊ नये. कारण दुपारी पाणी दिले तर ते गरम होते आणि झाडाची मुळे खराब होण्याची शक्यता असते. मुळ खराब झाले तर झाड खराब होते. झाडावर पाण्याचा फवारा द्यावा.
झाडाला देण्यासाठी दोन वस्तूचा वापर (Jawand Fertilizer)
शेंगाची टरफले
झाडांच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरील फांद्या मजबूत होण्यासाठी ज्या घटकांची, पोषक तत्वांची आवश्यकता असते ते सर्व घटक टरफलामध्ये मुबलक प्रमाणात असतात. याचा वापर खत म्हणून करताना टरफले मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची.
ही मातीमध्ये कोरडी मिक्स करू शकता किंवा याच्यापासून लिक्विड खत तयार करून दिले तरी चांगला फायदा होतो. ३ दिवस ही टरफले पाण्यात मिक्स करायची आणि त्यानंतर झाडाला द्यावे.
बटाट्याच्या सुकलेल्या साली
झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या घटकांची आवश्यकता असते ते बटाट्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात. झाडावरील कळ्या, फुलांचा आकार मोठा होण्यासाठी हे खत फायदेशीर ठरतं.
उन्हाळ्यामध्ये बटाट्याच्या साली सुकवून त्याची पावडर केली तर ती तुम्ही वर्षभर खत म्हणून वापरू शकता. बटाट्याच्या सालीप्रमाणेच तुम्ही केळ्याच्या सालीचादेखील वापर करू शकता.
खत देण्यापूर्वी माती हलवून घ्यावी. खत मातीत टाकल्यानंतर त्यात थोडे पाणी टाकावे.