Hibiscusflower Tips: जास्वंदाचं रोप घरी असावं असं सगळ्यांनाच वाटतं. श्रीगणेशाचं आवडतं फूल म्हणजे जास्वंद. घरी बाप्पाची पूजा करताना आपल्या बागेत फुललेलं एखादं तरी फूल चरणावर वाहावं अशी अनेकांची इच्छा असते. याच इच्छेपोटी आपण बाजारातून जास्वंदाच्या फुलांची रोपं आणतो, त्याला वेळोवेळी सूर्यप्रकाश व पाणी देऊन त्याची निगासुद्धा राखतो, रोप तुम्ही लावलेल्या लहानश्या कुंडीत बहरत जातं, त्याला अगदी टवटवीत पाने येतात, पण कळ्या? कळ्या मात्र काही केल्या येतच नाहीत. अशावेळी काय करावं हे आज आपण पाहणार आहोत. जास्वंदाच्या रोपाला वेगवेगळ्या पद्धतीची खते देणे खूप आवश्यक असते, यासाठी बाजारातून महाग सेंद्रिय खत किंवा केमिकल्स आणायची गरज नाही. पण, किचनमधील काही वस्तू वापरूनही काम पूर्ण करता येतं.
जास्त कळ्या, फुले येण्यासाठी खताच्या माध्यमातून पोषक तत्वे तितक्याच प्रमाणात देणे आवश्यक असते. जास्वंदाच्या झाडाला आलटून पालटून योग्य ती खते द्यावीच लागतात. त्यासाठी आपल्याला बाजारातून खते विकत आणण्याची गरज नसते. आपल्या घरात अशा बऱ्याच वस्तू असतात, ज्याचा तुम्ही खत म्हणून वापर केला तर या झाडाची वाढ चांगली होते आणि भरपूर फुले झाडावर लागतात.
झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातील दोन वस्तूंचा वापर करून आज आपण खत तयार करून घेणार आहोत. झाडावर किड लागते तेव्हा कोणते किटकनाशक फवारायचे याबद्दलदेखील आज आपण जाणून घेणार आहोत.
जेव्हा झाडाची छाटणी केल्यानंतर झाडावर कळ्या यायला सुरुवात होते तेव्हा या कळ्यांवर कोवळ्या पानांवर किड लागते, त्यामुळे झाडावर कोणतेही कीटकनाशक फवारू शकतात. यासाठी तुम्ही आपल्या घरामध्ये असलेल्या बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. एक लिटर पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा बेकिंग सोडा मिक्स करून त्या पाण्याचा स्प्रे केला तर पाने हिरवीगार होतात. झाडाची किड निघून जाते.
जास्वंदच्या रोपाला द्या हे खत
जास्वंदाच्या झाडावर भरपूर फुले लागण्यासाठी वेळोवेळी आलटून पालट़ून खत द्यावे लागते. यासाठी डाळ व तांदूळ धुतलेले पाणी आपण खत म्हणून वापरू शकतो. याचा वापर केला तर झाडाची वाढ चांगली होते. यामध्ये अशी पोषक तत्त्वे आहेत, ज्यामुळे झाडे चांगली वाढतातच पण झाडाची पाने हिरवीगार, तजेलदार व मोठ्या आकाराची होतात. तांदूळ आणि डाळीचे हे पाणी दोन दिवस तसेच ठेवायचे आणि वापरताना यात पाणी मिक्स करून मगच वापरायचे.
आता यात दुसरी वस्तू मिक्स करायची आहे, जी म्हणजे कॉफी पावडर. कॉफी पावडर झाडांना फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर असते, कारण यात जे नायट्रोजन पोटॅशियमसारखे घटक असतात, ज्यामुळे झाडांची वाढ होऊन भरपूर फुले लागतात.
त्याचबरोबर कॉफी ही कुंडीतील माती अॅसिडयुक्त करण्याचे काम करते आणि झाडांना भरपूर फुले येण्यासाठी अॅसिडयुक्त मातीचीच आवश्यकता असते. मात्र, याचा वापर आपण प्रमाणशीर करायचा आहे. म्हणजे डाळ तांदूळ धुतलेले पाणी जर एक लिटर असेल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढाच कॉफी पावडरचा वापर करायचा आहे.
खत देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची, म्हणजे आपण दिलेली जी खते आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि झाडाला त्याचा चांगला फायदा होतो. त्याचबरोबर अशा मातीमध्ये झाड चांगले वाढते.
आता हे जे खत आहे ते किती प्रमाणात द्यायचे, तर दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये जर हे झाड लावलेले आहे, तर त्याला एक ते दीड मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर या खताचा वापर केला तर झाडावर भरपूर फुले लागतील.
Video: जास्वंदाच्या रोपासाठी जुगाड