फॅमिली डॉक्टर
डॉ. विराग गोखले – response.lokprabha@expressindia.com

कावीळ या आजाराबाबत बहुतेकांच्या मनात गैरसमज असतात किंवा काविळीबद्दल चुकीची माहिती असते. खूपदा अर्धवट माहितीवर आधारित उपचार करून नंतरच्या दुष्परिणामांबाबत मात्र  डॉक्टरांवर ठपका ठेवला जातो.

‘काविळीचे औषध’ अशी पाटी, उसाचे रसवाले, केमिस्ट, एवढेच नाही तर केशकर्तनालयांबाहेरही पाहायला मिळतात! कावीळ म्हणजे काय, तर शरीरातील लाल रक्त पेशींचे आयुष्य १२० दिवसांचे असते. त्यानंतर, शरीरात त्यांचे विघटन होऊन पेशींमधील हीम या द्रव्यापासून पिवळ्या रंगाचे बिलीरुबीन बनते. यकृतात, या बिलीरुबीनवर प्रक्रिया होऊन, त्याचे संयुग्मित बिलीरुबीन होते. बिलीरुबीन मग पित्ताच्या मुख्य नलिकेतून आतडय़ात सोडले जाते. काही कारणांमुळे रक्तातील बिलीरुबीनचे प्रमाण वाढले की व मग त्वचा, डोळ्याचा दर्शनी पांढरा भाग (दृढपटल), पिवळट दिसू लागते. याला आपण कावीळ म्हणतो. कावीळ मुख्यत्वे तीन अगदी भिन्न विकारांमुळे होते.

रक्ताचे दोष : काही विकारग्रस्त लाल रक्त पेशींचे जास्त प्रमाणात विघटन होऊन रक्तातील बिलीरुबिनचे प्रमाण वाढते. हा हेमॉलिटिक जॉइण्डिस (haemolytic jaundice)

यकृताला सूज येणे (विषाणू, जीवाणू, तसंच काही विषांमुळे) : सुजलेले, विकारग्रस्त यकृत, संयुग्मित बिलीरुबीनचे छोटय़ा पित्तशिरांमध्ये उत्सर्जन करू शकत नाही. त्यामुळे ते रक्तात साचायला लागते. याला हेपिटायटिस जॉइण्डिस (hepatitic jaundice) म्हणतात.

पित्त नलिकांमध्ये कॅन्सर अथवा स्टोनमुळे अडथळा निर्माण झाल्यास, बिलीरुबीन उलटे वाहून रक्तात प्रवेश करते, याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉइण्डिस (obstructive jaundice) म्हणतात.

थोडक्यात, कावीळ, हे एवढय़ा भिन्न विकारांचे लक्षण आहे की त्या सर्वावर मात करणारे ‘काविळीचे औषध’ असूच शकत नाही. पॅरासिटेमॉल, क्रोसिन, कॅलपॉल वगरे गोळ्या कोणत्याही कारणामुळे ताप आला असला तरी ताप कमी करून रुग्णाची बेचनी कमी करू शकतात. पण काविळीतील लक्षणे पिवळेपणा (बिलीरुबीन) मुळे नसतात. त्यामुळे हा पिवळेपणा कमी करून रुग्णाला काहीच फायदा होत नाही. तसा तात्पुरता पिवळेपणा कमी करणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही.

कधी कधी लोक पांढरी कावीळ असा उल्लेख करतात. ही कावीळ नसून अ‍ॅनिमिया अथवा पंडुरोग असावा. रक्तातली कावीळ आणि पोटातली कावीळ असाही उल्लेख लोकांच्या बोलण्यात असतो. सर्वसाधारणपणे कावीळ ही यकृताच्या म्हणजे पोटातील इंद्रियाच्या बिघाडामुळे होत असते. रक्तात बिलीरुबीन या पिवळ्या रेणूचे प्रमाण वाढते तेव्हाच कावीळ बाहेर दिसू लागते. त्यामुळे पोटातील तसंच रक्तातील कावीळ या नावांना काही अर्थ नाही.

आधी म्हटल्याप्रमाणे काविळीची अनेक कारणे आहेत. साथीची कावीळ अथवा विषाणूजन्य यकृत-सुजेची कावीळ, हाच सामान्यत: दिसणारा काविळीचा प्रकार आहे. या प्रकारच्या काविळीला, व्हायरल हेपिटायटिस अथवा इन्फेक्टिव्ह हेपिटायटिस म्हणतात. या लेखात आपण मुख्यत्वे याच प्रकारच्या काविळीची माहिती करून घेणार आहोत.

ही साथीची कावीळ, हेपिटायटिस अ व हेपिटायटिस ए या विषाणूंमुळे होते. विकारग्रस्त व्यक्तीच्या मलमूत्रातून विषाणू बाहेर पडतात. त्या व्यक्तीने दूषित केलेले पाणी, अन्न, भांडी यातून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. आरोग्याशास्त्रीय स्वच्छतेचा अभाव असतो तेथे हा विकार जास्त प्रमाणात आढळतो. आफ्रिका, दक्षिण आशिया, दक्षिण अमेरिका वगरे भागात आठ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग होतो. कावीळ दिसायला लागायच्या एक आठवडा आधी, तसंच कावीळ दिसू लागल्यावर दोन आठवडे हे विषाणू त्या व्यक्तीच्या विष्ठेतून बाहेर पडत असतात. उकळी फुटल्यानंतरही काही मिनिटे पाणी उकळत ठेवल्यास हे विषाणू मरतात. नेहमीच्या डोसमध्ये पाण्याचे क्लोरिनेशन करूनही ते नष्ट होत नाहीत. विहिरीच्या पाण्यात हे विषाणू दहा आठवडे जिवंत राहू शकतात.

हेपिटायटिस ए च्या विषाणूंचा शोध काश्मीरमध्ये १९७८ साली लागला. मग असे ध्यानात आले की प्रौढांना होणारी साथीची कावीळ ही हेपिटायटिस ए मुळे होते. लहानपणी हेपिटायटिस अ होऊन गेल्यामुळे, जवळजवळ सगळ्यांना अ प्रतिबंधक इम्युनिटी अथवा प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते. ए विषाणूसुद्धा अन्न तसंच पाण्यातून पसरतात.

सर्वसाधारण विषाणूजन्य विकारासारखी म्हणजे डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, पोटात मळमळ आणि क्वचित उलटय़ा, मध्यम तीव्रतेचा ताप ही लक्षणे कावीळ दिसायला लागायच्या काही दिवस आधी निर्माण होतात. जास्त गडद रंगाची लघवी होत असल्याची तक्रारही काही रुग्ण करतात. ही विषाणूजन्य तापाची लक्षणे कमी होत जातात तसा काविळीचा पिवळेपणा दिसू लागतो. आधी डोळ्यात पिवळेपणा दिसतो. नंतर त्वचेचा रंग पिवळसर झाल्याचे ध्यानात येते. हा पिवळेपणा एक ते चार आठवडे राहतो व हळूहळू कमी होऊ लागतो. साधारण पाचव्या सहाव्या दिवसापासून भूक सुधारते. रुग्णाला थोडाबहुत अशक्तपणा वाटत राहतो. लहान मुलांची आणि तरुणांची कावीळ खूप वेगाने बरी होते. अनेक वेळा, विषाणूंमुळे यकृताला सूज येते, पण बाहेर दिसण्याइतपत कावीळ निर्माण होत नाही.

साथीच्या काविळीचे एक गमतीदार लक्षण म्हणजे, नेहमी धूम्रपान करणाऱ्या अथवा नेहमी दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला हा विकार झाला असेल तर दारू आणि सिगरेटचा तिटकारा निर्माण होतो. अर्थात, विकार बरा झाल्यावर ते पूर्वपदावर येतात!

कधी कधी यकृताला आलेल्या सुजेमुळे यकृतातील छोटय़ा पित्त शिरा ब्लॉक होतात. पित्त आतडय़ापर्यंत न पोचल्याने विष्ठेचा रंग पिवळ्याऐवजी चीनी मातीसारखा पांढरा दिसतो. ब्लॉक झालेल्या पित्तमार्गामुळे, बाईल सॉल्टचे रक्तातील तसंच त्वचेतील प्रमाण वाढते. यामुळे शरीराला कंड सुटतो. यकृताची सूज कमी व्हायला लागली की ही लक्षणे सुधारतात.

हेपिटायटिस ए मुळे होणाऱ्या काविळीचीही, सर्वसाधारणपणे हेपिटायटिस  अ सारखीच लक्षणे असतात. पण गर्भारपणात ही कावीळ झाल्यास, त्यापासून आई तसेच बाळ या दोघांनाही इजा होण्याची शक्यता जास्त असते. यकृताच्या पेशींमध्ये एसजीओटी (SGOT) आणि एसजीपीटी (SGPT) ही दोन विकरे असतात. यकृताला इजा झाली की ही विकरे पेशीतून रक्तात जातात. आधी उल्लेखिलेले बिलीरुबीन, (SGOT) आणि एसजीपीटी (SGPT) यांच्या रक्तातील वाढीव प्रमाणावरून यकृताला सूज आल्याचे निदान पक्के करता येते. अ आणि ए विषाणूंना नष्ट करायला शरीरात ज्या अण्टिबॉडी निर्माण होतात, त्यावरून कोणत्या विषाणूंचा संसर्ग झाला आहे त्याचे निदान करता येते.

उपचार : यकृत हे सर्व शरीरातील चयापचयाचे मुख्य केंद्र असल्यामुळे काविळीत यकृत विकारग्रस्त झाल्यावर संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला जायचा. उभ्या अवस्थेत यकृताच्या रक्तपुरवठय़ातही बाधा येऊन यकृत नॉर्मल स्थितीत यायला वेळ लागेल अशीही समजूत होती. पण अनेक पाहण्यांत असे आढळून आले की आराम केल्याने अथवा न केल्याने यकृत सुधारणेला सारखाच वेळ लागतो. त्यामुळे पेशंटला अशक्तपणामुळे काही करण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत त्याने आराम करावा, नंतर त्याने घरातील नेहमीचे व्यवहार करायला काहीच हरकत नाही. वारंवार उलटय़ा होत असल्यास, जास्त ताप असल्यास, पेशंट गरोदर असल्यास हॉस्पिटलमध्ये भरती करणे श्रेयस्कर.

आहार : वर्षांनुवष्रे सर्वसाधारण लोकांमध्ये तसेच काही पद्धतीच्या वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये, काविळीमध्ये तेलातुपाचे पदार्थ पूर्ण व्यर्ज करणे गरजेचे असल्याचा समज आहे. आजकालच्या टेक्स्ट बुकमध्ये काविळीच्या आहाराबद्दल फक्त एकच वाक्य असते, भरपूर उष्मांक असलेले पोषक अन्न. स्निग्ध पदार्थामध्ये जास्त उष्मांक असतात. स्निग्ध पदार्थ अधिक रुचकर असल्यामुळे पेशंटला खायची इच्छा होते. या विकारात, यकृत आणि इतर पचनेंद्रियांची पचनक्षमता पूर्ण नॉर्मल असते म्हणूनच तेलकट-तुपकट पदार्थ व्यर्ज करायचे काहीही कारण नाही. शीला शरलॉक या सुप्रसिद्ध यकृत विकारतज्ज्ञांच्या मते, स्निग्ध पदार्थाचे सेवन न केल्याने यकृतामध्ये सुधारणा व्हायला वेळ लागतो आणि रुग्णाचा अशक्तपणा जास्त काळ राहतो. विकाराच्या प्राथमिक अवस्थेत, पहिले तीन ते पाच दिवस पेशंटला पोटदुखी, उलटय़ा होत असताना, मऊ, बिनतिखट-मसाल्याचे पदार्थ देणे अधिक चांगले. पण नंतर मात्र पूर्ण आहार हाच योग्य. उसाच्या रसाला आहारातील एक द्राव्य पोषक घटक एवढेच महत्त्व आहे. कावीळ अथवा कावीळ निर्माण करणाऱ्या विषाणूंवर त्याचा काहीही विशेष उपयोग नाही. दारू तसेच सर्व प्रकारची अल्कोहोलिक पेये यांना मात्र काही महिने दूर ठेवावे लागते.

आता जाणून घ्यायचा मुख्य मुद्दा हा की, हेपिटायटिस अ आणि हेपिटायटिस ए च्या विषाणूंना मारायला कोणतेही औषध उपलब्ध नाही. शरीरातच अ‍ॅण्टिबॉडी निर्माण होतात आणि त्या या विषाणूंना नष्ट करतात. या प्रक्रियेला एक ते सहा आठवडे लागतात. एखादी अपवादात्मक केस सोडल्यास सर्व रुग्ण पूर्ण बरे होतात. रुग्णाला या काळात जरुरीपुरता आराम आणि योग्य पोषण एवढेच लागते. एकदा आधुनिक वैद्यक शास्त्रात काही ठोस उपचार नाही, हे कळले की मग नाना प्रकारची वैकल्पिक औषधे गुणकारी म्हणून पुढे केली जातात. जो रोग एरवी शरीरातील प्रतिकारशक्तीमुळे बरा होतो, तो आमच्याच औषधाने बरा झाला म्हणून छातीठोकपणे सांगितले जाते. आधुनिक औषधांना विकल्प म्हणून पुढे केलेली औषधे परिणामकारक ठरत असल्याचा कुठचाही पुरावा नाही. पोटावर वा हातापायावर लोखंडी सळी तापवून डाग देणे हा एक निरुपयोगी आणि घातक अघोरी उपाय आहे. गळ्यात कसल्या तरी मुळींची माळ घालतात; कावीळ बरी होते तशी तिची लांबी वाढत जाते, असे सांगितले जाते. याचा उपयोग शून्य पण रुग्णाला त्यापासून अपाय तरी होत नाही.

मिल्क थिसल नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून सिलिमरीन नावाचा अर्क काढतात. हा अर्क विषाणूंना मारू शकत नाही, पण त्याच्या अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट गुणधर्मामुळे यकृताच्या पेशींचे रक्षण करू शकतो. या एकाच हर्बल औषधाला मेयो क्लिनिक या ख्यातनाम अमेरिकी संस्थेने मान्यता दिली आहे. डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी आयुर्वेदिक औषधांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला होता. यकृताच्या पेशींचे रक्षण करणारे काही घटक, गुडूची अथवा गुळवेलात असल्याचे त्यांना त्यांच्या अभ्यासात आढळले होते. दुर्दैवाने कावीळ सदृश विकाराने त्यांचा अकाली मृत्यू झाला.

काविळीचे रुग्ण हाताळताना डॉक्टरांवर कधी कधी विनाकारण हलगर्जीपणाचा आरोप केले जातात. प्रथमत: साथीच्या काविळीत आधी साध्या व्हायरल तापाचीच लक्षणे असतात. नंतर कावीळ उशिरा दिसू लागते. रुग्णाला विनाकारण खर्चात टाकू नये म्हणून अनेक वेळा डॉक्टर लगेचच रक्त-तपासण्या वगरे करून घ्यायचे टाळतात. काही दिवसानंतर कावीळ झाल्याचे लक्षात येते आणि डॉक्टरवर वेळेवर निदान न केल्याचा ठपका ठेवला जातो.

साथीच्या काविळीच्या विषाणूंना मारायला औषधे नाहीत, याचा वर उल्लेख केलेलाच आहे. डॉक्टर रुग्णाला फक्त लक्षणानुरूप औषधे देऊन त्याचा विकारकाळ अधिक सुसह्य़ व्हावा यासाठी प्रयत्न करतात. यकृताला अन्य काही कारणांमुळे इजा होऊ नये म्हणूनही मार्गदर्शन करतात. पण विकार हळूहळू वाढत जातो. नंतर हळूहळू सुधारणा होते. सुरुवातीला रिपोर्टमध्ये दाखवलेले एसजीपीटी (SGPT) तसेच बिलीरुबिनचे प्रमाण आठवडय़ानंतर आणखी वाढलेले दिसते. पेशंट आणि त्याचे आप्तेष्ट घाबरतात. डॉक्टरला  उपचार जमत नाही म्हणून दूषणे देतात. डॉक्टर बदलण्याबाबत कुजबुज सुरू होते, पण येथे डॉक्टरचा काहीही दोष नसतो. विकार त्याच्या ठरलेल्या कालावधीनुसार वाढतो, कमी होतो आणि नंतर पूर्ण बरा होतो.

कधी कधी पूर्ण निरोगी अशा साधारण सात टक्के भारतीयांमध्ये, असंयुग्मित बिलीरुबिनचे प्रमाण वाढलेले दिसते. रिपोर्टमध्ये याचा उल्लेख अप्रत्यक्ष अथवा अनकॉन्ज्युगेटेड बिलीरुबिन असा केलेला असतो. याला गिल्बर्ट सिंड्रोम असे नाव आहे. या रिपोर्टला यकृताची सूज कारणीभूत नसते. यामुळे त्या व्यक्तीला काहीही अपाय होत नाही आणि पुढेही व्हायची शक्यता नसते. पण अनेक जण तो रिपोर्ट पाहून विनाकारण घाबरून जातात आणि डॉक्टरांकडे खेटे घालत बसतात.

हेपिटायटीस अ विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून आज लस उपलब्ध आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकात त्याचा अंतर्भाव केलेला आहे. पण आरोग्यविषयक स्वच्छतेबाबत जागरूक राहणे त्याहूनही महत्त्वाचे आहे.

शेवटी, बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, कावीळ झालेल्या माणसाच्या नजरेला सगळेच पिवळे दिसते! डोळ्याचे पारपटल (cornea) आणि बुब्बुळाच्या मध्ये अ‍ॅक्वेअस ह्य़ुमर (aqueous humour), हे द्रव्य असते. खूप जोराची कावीळ झाल्यास, बिलीरुबिनचे काही रेणू या अ‍ॅक्वेअस ह्य़ुमर मध्ये प्रवेश करतात व त्यामुळे रुग्णाला सभोवतालच्या दृश्यात हलकी पिवळी झाक दिसू शकते. याला  xanthopsia म्हणतात. अर्थात हा प्रकार अति अपवादात्मक केसेसमध्ये होऊ शकतो.

थोडक्यात, हेपिटायटिस अ निर्मित कावीळ म्हणजेच आपण सर्वसाधारण पाहतो ती कावीळ. ९९.९ टक्के केसेसमध्ये, कोणत्याही विशिष्ट विषाणूरोधक औषधांशिवाय आणि गुंतागुंत निर्माण न होता कावीळ बरी होते. वैकल्पिक औषधांमुळे विकार लवकर बरा होतो या समजुतीला काहीही शास्त्रीय आधार नाही. ती बरी होईपर्यंत यकृताला अन्य कारणांमुळे इजा होऊ नये, याची काळजी डॉक्टरी सल्ल्याने घेता येते. बाकी कोणत्याही खास पथ्याची गरज नसते. काविळीत विनाकारण पथ्य करून वा करवून रुग्णाला पोषक आहारापासून वंचित करू नये.
सौजन्य – लोकप्रभा