बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित जावा मोटरसायकल आज अखेर भारतात लाँच झाली आहे. कंपनीने या मोटरसायकलचे ‘जावा, जावा 42 आणि जावा पेराक’ असे तीन नवे मॉडेल्स सादर केले आहेत. महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकिच्या क्लासिक लीजंड्स या कंपनीच्या पुढाकाराने जावा ही अत्यंत प्रतिष्ठेची व भारतात एकेकाळी प्रचंड लोकप्रिय असलेली मोटरसायकल अखेर भारतात लाँच झाली आहे.
Jawa is back! Because the Jawa never really went away, it was just out taking a bit of a ride! Presenting the Jawa and Jawa forty two.https://t.co/Klhl7ldrV5#Jawa #JawaMotorcycles #JawaIsBack
— Jawa Motorcycles (@jawamotorcycles) November 15, 2018
किंमत –
दी जावा – 1.64 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)
जावा 42 – 1.55 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)
जावा पेराक – 1.89 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)
आज लाँच करण्यात आलेल्या तीन मॉडेल्सपैकी दोन मॉडेल्समध्ये 293 सीसीच्या इंजिनाचा वापर करण्यात आला आहे, तर Jawa Perak मध्ये 334 सीसीच्या इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. जावा मोटरसायकल या मूळच्या झेक कंपनीचं पहिलं मॉडेल 1929 साली जन्माला आलं ते 499 सीसीचं होतं. देशभरात एकूण 105 डिलर्सकडे ही मोटरसायकल विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे, तसंच डिसेंबरपर्यंत अजून 64 डिलर्सकडे ही मोटरसायकल विक्रीसाठी आणि टेस्ट राइडसाठी उपलब्ध होईल असं लाँचिंग कार्यक्रमात सांगण्यात आलं आहे.
क्लासिक लीजंड या महिंद्रांच्या मालकिच्या कंपनीनं झेक ब्रँडच्या भारतातल्या विक्रीसाठी आवश्यक ते परवाने घेतले आहेत. मध्यप्रदेशमधल्या पिथमपूर इथल्या कारखान्यात जावाचं उत्पादन केलं जात आहे. विशेष म्हणजे जावाची स्वतंत्र ओळख जपण्यात येणार असून गाडीवर महिंद्राचा लोगो लावण्यात येणार नाही व डीलर्स वगैरे वेगळे नेमण्यात येणार आहेत. सध्या अशा प्रकारच्या हायएंड बाईक्सची मोठी चलती असून हार्ले, डुकातीसारख्या विदेशी कंपन्यांच्या मोटरसायकलनाही विशेष मागणी आहे. या पार्श्वभूमीवर एकेकाळी तरूणाईनं उचलून धरलेल्या जावाला आताचा तरूण वर्ग कसं स्वीकारतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
इटलीमधल्या वरेसी इथल्या तांत्रिक केंद्रामध्ये जगातील आघाडीच्या इंजिन तज्ज्ञांबरोबर काम केल्यानंतर नवीन जावा तयार करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या बाईकचं वैशिष्ट्य सांगताना आयुष्यभर साथ देईल असं नमूद करण्यात आलं आहे. इंजिनच्या एगझॉट यंत्रणेवर विशेष मेहनत घेण्यात आली असून योग्य त्या पाईपांची निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे हवा तो परिणाम साधला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.