जिओने काही दिवसांपूर्वी बाजारात येत धमाका उडवला होता. जिओच्या धमाकेदार ऑफर्समुळे बाजारातील इतर कंपन्यांचे धाबे दणाणले होते. काही दिवसांपूर्वी जिओने आपला फोन बाजारात दाखल करत टेलिकॉम क्षेत्रात आणखी एक धक्का दिला होता. आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा एक आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. याबरोबरच अनलिमिटेड एसएमएस आणि जिओ अॅप्सचाही ग्राहकांना लाभ घेता येणार आहे.

आता या प्लॅनमुळे तुम्ही खूश झाले असाल तर पुढची गोष्ट कदाचित तुमच्या आनंदावर विरजण घालू शकते. कारण हा १९९ रुपयांचा प्लॅन ज्या ग्राहकांकडे शिओमीचा रेडमी नोट ५ ए हा फोन आहे त्यांच्यापुरताच मर्यादित आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची असेल. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना दर महिन्याला हे १९९ चे रिचार्ज करावे लागणार आहे.

विशेष म्हणजे ही ऑफर फक्त रेड मी ५ ए वापरणाऱ्यांना देण्यात आलेली असल्याने हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जिओकडून खास कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांना १२ महिने १९९ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. हे रिचार्ज ५ डिसेंबर २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत करावे लागेल. यामध्ये ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये १०० रुपयांचे १० व्हाऊचर्स जमा केले जातील. शिओमी कंपनीकडूनही ग्राहकांना कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. शिओमीकडूनही रेड मी ५ ए हा फोन खरेदी केल्यानंतर १ हजार रुपयांचे अतिरिक्त डिस्काऊंट मिळणार आहे. ही ऑफर शिओमीचा हा फोन घेणाऱ्या पहिल्या ५० लाख ग्राहकांना मिळेल असेही कंपनीने सांगितले आहे. या फोनमध्ये २ जीबी आणि ३ जीबी रॅम असे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

Story img Loader