आपलं लहान मूल शाळेत जायच्या वयात आलं की प्रत्येक पालकाची मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठीची धडपड सुरू होते. मूल शाळेत जायला लागलं तरी, तसं ते वयाने लहानच असत. प्रथमिक शाळेत क्रमिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या या चिमुकल्यांच आपलं असं वेगळ भावविश्व असतं. जो व्हेल नावाच्या ब्रिटिश मुलाचदेखील काहीस असच आहे. चित्रकलेची आवड असणाऱ्या जोला डुडल रेखाटण्याचा छंद आहे. शाळेत वर्ग चालू असतानादेखील तो डुडल रेखाटत असे. शिक्षक अनेकवेळा जोच्या पालकांकडे त्याची तक्रार करत.

परंतु जोच्या पालकांनी त्याला छंद जोपासण्यापासून परावृत्त न करता त्याच्यातील कलात्मकतेला वाव देण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी जोला चित्रकलेच्या क्लासला पाठविण्यास सुरुवात केली. शाळा सुटल्यावर जो चित्रकलेच्या क्लासला जातो. क्लासला जायला लागल्यापासून त्याच्या डुडल रेखाटण्यात चांगली प्रगती होत आहे. त्याची ही प्रगती पाहून चित्रकलेची शिक्षिकादेखील आश्चर्यचकीत झाली. जोने रेखाटलेली चित्रं तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यास सुरुवात केली. यातूनच जोला एवढ्या लहान वयात खऱ्या अर्थाने कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

एका रेस्तराँच्या मालकाने जोची ही चित्रे पाहून त्याच्या शिक्षिकेशी संपर्क साधला. आपल्या रेस्तराँमधील एक भिंत जोने त्याच्या रेखाचित्रांनी सजवावी अशी त्यांची इच्छा होती. जोनेदेखील आवडीचे काम करायला मिळतय म्हटल्यावर आनंदाने होकार दिला. तो शाळा सुटल्यावर वडिलांसोबत गाडीतून रोस्तराँमध्ये जाऊन भिंतीवर रेखाचित्र काढत असे.

जोने लहान वयात प्राप्त केलेले यश पाहून त्याचे वडील कमालीचे सुखावले आहेत. सुंदर रेखाचित्र रेखाटणाऱ्या जोची शाळेत अभ्यासामधील प्रगतीदेखील वाखाणण्याजोगी आहे. तो उत्तम फुटबॉलपटू आणि क्रिकेटपटूदेखील आहे. असं असलं तरी चित्रकला ही त्याची सर्वात आवडती गोष्ट आहे, अशी माहिती त्याच्या वडिलांनी मॅट्रोशी बोलतांना दिली.

पालकांनी आपल्या मुलांचा कल कुठे आहे हे वेळीच जाणून अभ्यासासोबत त्यांना छंद जोपासण्यासाठी योग्यप्रकारे मार्गदर्शन, मदत आणि प्रोत्साहन दिल्यास नक्कीच असं काहीतरी आश्चर्यकारक घडू शकत.

Story img Loader