ध्यानधारणेतून मनाचा सावधपणा, सचेतनता वाढविण्याचे प्रशिक्षण हे वजन नियंत्रणात ठेवण्याचेही एक प्रभावी माध्यम आहे. मनोविकासाच्या अशा कार्यक्रमांतून अतिरिक्त असलेले वजन घटविण्यास मदत होते, असे शास्त्रज्ञांना आढळले आहे.
‘जर्नल ऑफ क्लिनिकल एण्डोक्रिनोलॉजी अॅण्ड मेटाबोलिजम’ मध्ये याबाबतचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. मनोविकासाचे हे प्रशिक्षण म्हणजे लठ्ठपणा टाळण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
मोठय़ा प्रमाणावर वजन नियंत्रणात आणण्याच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून मन सचेतन करण्याच्या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या व्यक्तींचे वजन मनोविकास प्रशिक्षणात सहभागी न झालेल्या व्यक्तींच्या तुलनेत सहा महिन्यांतच जास्त घटल्याचे निदर्शनास आले आहे.
मनाचा सावधपणा म्हणजे मन आणि शरीराच्या नियमनातून स्वत:च्या विद्यमान मनोवस्थेचे आणि सभोवतालच्या वातावरणाच्या चालू स्थितीचे उच्चस्तरीय भान येणे. अशा प्रकारच्या मनोअभ्यासाचा त्या व्यक्तीचे वजन नियंत्रणात आणण्यासाठी कशा प्रकारे लाभ होऊ शकतो, याचा या अभ्यासात विचार करण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरातच लठ्ठपणाच्या समस्येत १९७५ पासून तिप्पट वाढ झाली आहे. २०१६ मधील आकडेवारीनुसार, जगभरातील १९० कोटींहून अधिक प्रौढ व्यक्ती लठ्ठ किंवा प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या होत्या.
इंग्लंडमधील वार्विक विद्यापीठातील पीएचडीच्या विद्यार्थी पेट्रा हॅन्सन यांनी सांगितले की, हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. खाण्यापिण्याच्या बिघडलेल्या सवयी मनाच्या सावधपणाच्या प्रक्रियेतून आपण सुधारू शकतो, हे आम्ही यात दाखवून दिले आहे.