Nonstick Pan Cleaning Hacks: पोळी चिकटू नये, शॅलो फ्राय करताना फार वेळ लागू नये आणि पदार्थ हवा तसा क्रिस्पी व्हावा म्हणून अनेकजण हल्ली चांगल्या नॉनस्टिक पॅनमध्ये पैसे गुंतवतात. पण अगदी कितीही चांगला तवा घेतला तरी कालांतराने त्याचा पृष्ठभाग खराब होण्याची शक्यता असतेच. अनेकदा त्यावर जाडसर कार्बनचे थर जमू लागतात आणि परिणामी त्याचं नॉनस्टिक फीचर हळूहळू कमी होऊ लागतं. तेल कमी वापरावं म्हणून घेतलेला तवा दुप्पटीने तेल खाऊ लागतो. आता हा थर घासून तवा स्वच्छ करावा म्हटलं तर नॉनस्टिक पॅन घासण्यासाठी तारेचा काथ्या सुद्धा वापरता येत नाही कारण अशाने तव्यावर चरे पडू शकतात. हीच समस्या लक्षात घेऊन केलेला एक मीठाचा उपाय सध्या अनेकांची पसंती मिळवत आहे. रेणुका साळुंके या अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अवघ्या दहा मिनिटांत आणि खरंतर एकही नवा रुपया खर्च न करता तवा कसा स्वच्छ करायचा याची हॅक सांगितलेली आहे. चला तर मग हा जुगाड नेमका कसा करायचा आणि त्याचा नेमका काय फायदा होईल हे पाहूया.

@homecheff_renu या अकाउंटवर रेणुका यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तवा स्वच्छ करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करायला सांगितल्या आहेत. यानुसार…

१) सर्वात आधी गॅस पेटवून त्यावर तवा गरम व्हायला ठेवा
२) तवा साधारण गरम झाला की त्यावर दोन ते तीन चिमुट मीठ पसरवा
३) मीठ तापल्यावर आपण घरातील साधा कालथा/ पलिता घेऊन तवा घासा.
४) हे मीठ स्क्रबसारखं काम करतं, त्यामुळे कार्बनचा जाड थर सहज सुटू लागतात व मिठाच्या कणांमध्ये मिसळतात.
५) एकदा या पद्धतीने स्क्रब केल्यावर मीठ काढून टाकून द्या व वरील चार स्टेप्स पुन्हा एकदा फॉलो करा.
६) उरलेले कार्बनचे कण दुसऱ्या फेरीत निघून जातील त्यानंतर साबणाच्या लिक्विडने किंवा पाण्याने स्पंज वापरून तवा घासून स्वच्छ करा.

या पद्धतीने तवा स्वच्छ करताना कालथा फार जोरात घासू नका अन्यथा तव्यावर चरे पडू शकतात. यासाठी वाळूचा वापर सुद्धा करता येईल पण मीठ त्यातल्या त्यात सहज उपलब्ध असणारा व स्वस्त पर्याय असल्याने त्याचाच वापर करता येईल.

हे ही वाचा << Teeth Whitening: दातांवरील पिवळे डाग गायब करू शकतात ही ४ फळे; डेंटिस्टने सांगितलेले हे उपाय वाचा व खळखळून हसा

नेटकऱ्यांनी या उपायाला काही प्रमाणात पसंती दर्शवली असली तरी काहींनी कमेंट बॉक्समध्ये ही पद्धत घातक ठरू शकते असंही म्हटलं आहे. अशाप्रकारे स्क्रब केल्यावर तव्याचा नॉनस्टिक कोट सुद्धा निघून जाईल. यामुळं कॅन्सरही होऊ शकतो असेही दावे काहींनी केले आहेत. अर्थात याचा पुरावा कुणी दिलेला नाही. खबरदारीचा मार्ग म्हणून आपण ही पद्धत लोखंडी तव्यावर किंवा कढईसाठी वापरू शकता.