Karwa Chauth Vrat for Unmarried Girls: कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला सुवासिनी महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचं व्रत ठेवतात. यंदाच्या वर्षी करवा चौथ २४ ऑक्टोबर रोजी साजरा होतोय. या व्रताची ओळख कठोर नियमांसाठी केली जाते. सूर्योदयाच्या आधी या व्रताला सुरूवात होते. सुवासिनी महिला संपूर्ण दिवस निर्जल व्रत करतात आणि देवापाशी प्रार्थना करतात. महिला दिवसभर व्रत ठेवून शुभ वेळेत चंद्रासह शिव-पार्वती, गणेश आणि कार्तिकेयाची पूजा करतात. रात्री चंद्राची पूजा करतात आणि चंद्र पाहिल्यानंतर चाळणीतून पतीकडे पहण्याची पद्धत असते. यानंतर पतीच्या हातून पाणी पिऊन हा उपवास सोडतात. पण आजच्या काळात हे व्रत कुमारी मुली सुद्धा करताना दिसून येतात. काही मुली तर आपल्या प्रियकरासाठी सुद्धा हे व्रत करण्याचा नवा ट्रेंड आलाय. तर ज्या मुलींची लग्न ठरली आहेत, अशा मुलीसुद्धा त्यांच्या भावी पतीसाठी हे व्रत करताना दिसून येतात. पण कुमारी मुलींनी हे व्रत करणं किती योग्य आहे? हे जाणून घेऊयात…
सुवासिनी महिला का करतात हे व्रत?
भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाणा,हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात. ज्यावेळी मुलगी लग्न करून सासरी जाते, त्यावेळी सुरूवातीला पहिलं व्रत ठेवलं जातं. हिंदू धर्मात लग्न हे केवळ दोन शरीराचं नव्हे तर दोन आत्माचं मिलन मानलं जातं. लग्नानंतरच्या पहिल्या व्रतासाठी नव्या नवरीच्या मनात नव्या आशा आणि श्रद्धा असतात. घरातील वयस्क महिलांच्या मदतीने ही नवी नवरी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी हे व्रत ठेवते. ज्यावेळी पतीला कळतं की आपली पत्नी आपल्यासाठी इतकं कठोर व्रत ठेवतेय, त्यावेळी त्याच्या मनात पत्तीसाठी आदरभाव निर्माण होतो. सोबतच जेव्हा पत्नी साज श्रृंगार करून पतीसमोर येत असते त्यावेळी तिच्या सौंदर्याने पतीच्या मनात पत्नीसाठी आकर्षण वाढतं. या व्रताच्या माध्यमातून पत्नीच्या मनातली पतीसाठीचं देवत्व दिसून येतं. असं मानलं जातं की हे व्रत केल्याने पती आणि पत्नीचं नातं आणखी घट्ट होऊन त्यांच्यातील विश्वास आणखी वाढतो.
कुमारी मुलींनी का ठेवू नये करवा चौथ व्रत ?
१. कुमारी मुलींसाठी हे व्रत करणे आध्यात्मिक दृष्टीने आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. करवा चौथचे कठीण व्रत करण्यासाठी कुमारी मुलींचं शरीर आणि मन हवं तितकं परिपक्व नसतं. ज्यावेळी मुलींवर विवाह संस्कार होतात, तेव्हा सातव्या फेरीनंतर मुलगी ही पतीची झाली, असं मानलं जातं. त्यानंतर मुली एक पत्नी रूपात आपल्या पतीसाठी हे व्रत करत असतात.
२. जर मुली आपल्या प्रियकर किंवा मग होणाऱ्या पतीसाठी हे व्रत करत असतील तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे व्रत पूर्ण विधिवत करणं असंभव असतं. कारण कुमारी मुलगी लग्नाआधी सोळा श्रृंगार करू शकत नाहीत आणि सासूकडून मिळत असलेल्या गोष्टी सुद्धा लग्नाआधी घेऊ शकत नाहीत.
३. या व्रताचा कुमारी मुलींच्या मनावर विशेष प्रभाव पडतो. जर संबंधित प्रियकर किंवा लग्न ठरलेल्या मुलासोबतच भविष्यात लग्न होऊ शकलं नाही तर तिला नैराश्याचा त्रास होऊ शकतो.
४. जर दुसऱ्या ठिकाणी लग्न जमलं तर मुलींच्या मनात जुन्या नात्यांबाबतच्या आठवणी घर करून बसतात. त्यामुळे मनात अशांती निर्माण होऊ शकते. तसंच दुसऱ्यांदा हे व्रत दुसऱ्या कुणासाठी करताना मन एकाग्र होत नाही.
५. करवा चौथचं हे व्रत अतिशय कठिण आणि गंभीर असतं. या सर्व कारणांमुळेच कुमारी मुलींनी भावनेच्या भरात किंवा मग सहज म्हणून हे व्रत करू नये.