दसरा हा सण चांगल्या प्रवृत्तीचा वाईट प्रवृत्तीवर विजय साजरा करण्यासाठी असतो. या निमित्ताने आपल्यातील काही चांगल्या व वाईट प्रवृत्तींबाबत मनन करण्याची संधी असते. याच भावनेने तुमच्या आर्थिक आरोग्याचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही वाईट आर्थिक सवयी कशा सोडू शकता ते पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बजेट तयार न करणे

बजेट ठरवल्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे किती पैसे आहेत आणि कोणते खर्च व जबाबदाऱ्या आवश्यक आहेत यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे खरेदी किंवा प्रवासासाठी तुमच्याकडे किती जास्त पैसे आहेत त्याचा तुम्हाला अंदाज येतो. बजेट ही पैशांच्या व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच बचत आणि खर्चांसाठी पैशांचे वाटप करा आणि उत्पन्नाहून जास्त खर्च होऊ नये यासाठी याचे काटेकोरपणे पालन करा.

आणीबाणीत निधी नसणे

सगळं काही सुरळीत चालले असताना, संकटाचा कोणी विचारच करत नाही, परंतु आपत्कालीन परिस्थिती न सांगताच उद्भवते आणि जर अचानक तुमची नोकरी गेली किंवा आरोग्याला धोका निर्माण झाला तर, तुम्ही बेसावध पकडले जाता. जर अशा अनपेक्षित परिस्थितींपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी तुमच्याकडे स्वतंत्र निधी नसेल तर तुमची सगळी बचत संपू शकते आणि तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. तुमच्या मासिक उत्पन्नाच्या सहा ते बारा पट निधी बाजूला ठेवा. ज्यायोगे उत्पन्नाचे तात्पुरते नुकसान झाल्यास तुम्हाला तुमची बिले भरता येतील आणि घरभाडे वगैरेची चिंता राहणार नाही.

विम्याकडे दुर्लक्ष करणे

जीवन आणि आरोग्य विमा हे वैयक्तिक अर्थपुरवठ्याचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. काहीजण याची बचतीच्या साधनांशी गल्लत करतात, काहीजण केवळ कर बचत करण्यासाठी विमा खरेदी करतात, तर बाकीचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. तुमचा अकाली मृत्यू झाल्यास जीवन विमा तुमच्या कुटुंबासाठी कौटुंबिक उत्पन्नाचे कार्य करतो. त्यामुळे, तो केवळ कर बचत करण्यासाठी नसावा तर उत्पन्नाच्या दृष्टिकोनातूनही पुरेसा असावा. दुसरीकडे आरोग्य विमा रुग्णालयात दाखल केल्यानंतर आणि त्यापूर्वीच्या खर्चांची काळजी घेतो. आरोग्यसेवेचे वाढते खर्च लक्षात घेता हा अनिवार्य आहे.

विलंबाने परतफेड करणे

तुमचा कर्जाच्या परतफेडीचा इतिहास कर्ज देणाऱ्यांसह शेअर केला जातो आणि क्रेडिट ब्युरोकडे त्याची नोंद ठेवली जाते. त्यामुळे कर्जाची परतफेड करण्यास विलंब झाल्यामुळे केवळ तुमचे कर्जाचे ओझेच वाढत नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअरही गडगडतो. क्रेडिट स्कोअर कमी असल्यास तुम्हाला भविष्यात कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते. तेव्हा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा कर्जाची परतफेड करण्यास नेहमी प्राधान्य द्यावे.

ध्येय न ठेवता गुंतवणूक करणे

तुमच्या सर्व महत्वाकांक्षांची पूर्तता करण्यासाठी आणि वाढत्या महागाईला मात देण्यासाठी संदिग्धपणे कशीही बचत करणे पुरेसे नाही. तुमच्या ध्येयांनुसार तुम्ही विशिष्ट आर्थिक साधनांमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत. तेव्हा तुमची अल्पकालीन, मध्यम आणि दीर्घकालीन ध्येये ओळखा आणि त्यानुसार गुंतवणूक करायला सुरुवात करा. यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या क्षितीजानुसार आणि जोखीम क्षमतेनुसार गुंतवणुकीची साधने निवडण्यास मदत होईल.

आधी खर्च आणि उरलेली बचत

आधी खर्च आणि उरलेली बचत मूर्खपणाचे आहे. त्यामुळे केवळ अनावश्यक खर्च होत राहतो. त्याऐवजी आधी तुमचे पैसे अडकवा आणि उरलेल्या पैशांतून खर्च करा. तुमचा आवश्यक खर्च मोजा आणि त्यासाठी पैसे बाजूला ठेवा. बाकीचे पैसे महिन्याच्या सुरुवातीलाच बाजूला ठेवावे. खरे तर तुम्ही तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 30% रकमेची बचत केली पाहिजे.

कर नियोजन नसणे

कर नियोजन हे शेवटच्या घडीला केले जात नाही तर, संपूर्ण वर्षभरात केले पाहिजे. तुमची कर दायित्वे समजावून घ्या आणि कर-सक्षम गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करा. त्यातून संपत्ती निर्माण करा आणि कराची कात्री कमी करा. पीपीएफ आणि इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करून कराचे दायित्व कमी करा आणि चांगले परतावे मिळवा.

निवृत्तीचे नियोजन नसणे

निवृत्तीसाठी बचत करण्याची वेळ येते तेव्हा ते पुढे ढकलत राहण्याची तरूण लोकांना सवय असते. निवृत्ती खूप दूर आहे असा समज असतो. तथापि, तुम्हाला वृद्धावस्थेत आरामात राहता यावे यासाठी तुमच्याच भविष्याचे तुम्ही देणे लागता. तसेच, जितक्या लवकर सुरुवात कराल तितके जास्त जमा कराल. तुमच्या पैशांवर चक्रवाढ व्याजाची जादू काम करत असते.

एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेणे

कर्ज घेतानाच, त्याच्या परतफेडीची योजना तयार असली पाहिजे. जर तुमचा ईएमआय तुमच्या उत्पन्नाहून जास्त असेल तर, तुमचे विद्यमान कर्ज फेडण्यासाठी तुम्ही दुसरे कर्ज घ्याल. यामुळे तुम्ही लवकरच कर्जाच्या जाळ्यात गुरफटत जाल. तुमचा ईएमआय आणि परतफेडीची रक्कम तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ३० टक्क्यांहून कमी राहील याची खात्री करा.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keep this things in mind for dasara celebration important financial tips
Show comments