हिवाळ्यामध्ये थंडी वाजते म्हणून अंघोळ न करण्याचा अनेकांचा कल असतो. हा प्रकार काही नवीन नाही. पण अशा थंडीत केस धुवायचे असतील, तर मात्र काहींच्या अंगावर काटा येतो. या वातावरणात, जर बिनपाण्याने केसांना शाम्पू करता आला तर? किती छान होईल नाही? असा नुसता विचार नका करू, तर प्रत्यक्षात करूनही बघा. कारण- कोरड्या शाम्पूची ही रेसिपी घरात असणाऱ्या सोप्या पदार्थांपासून तयार केली गेली आहे; ज्याचा वापर गडद किंवा फिक्या रंगाच्या अशा दोन्ही प्रकारच्या केसांसाठी केला जाऊ शकतो.
कोरडा शाम्पू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :
१/४ कप कप आरारूट पावडर किंवा कॉर्न स्टार्च
गडद रंगाच्या केसांसाठी १-२ चमचे कोको पावडर
फिक्या रंगाच्या केसांसाठी १-२ चमचे दालचिनी
सुगंध येण्यासाठी इसेन्शियल तेल [पर्यायी]
बंद झाकणाचा डबा
सूचना :
कोरड्या शाम्पूमधील सर्वांत महत्त्वाचा घटक हा केसांमधील अनावश्यक तेल शोषून घेण्याचे काम करीत असतो. आपण तयार करणाऱ्या कोरड्या शाम्पूमधील हा महत्त्वाचा घटक म्हणजे आरारूट पावडर. तुम्ही आरारूटऐवजी कॉर्न स्टार्चदेखील वापर करू शकता. परंतु, आरारूट पावडर ही जास्त बारीक आणि हलकी असते.
केसांचा रंग गडद असल्यास थोडा रंग मिसळा : ज्यांच्या केसांचा रंग गडद आहे, त्यांनी हा शाम्पू बनवताना त्यामध्ये थोडा रंग मिसळा. गडद केसांवर पांढरी पावडर दिसू शकते, असं होऊ नये म्हणून थोडा रंग मिसळू शकतो. त्यासाठी कोको पावडरचा रंग म्हणून चांगलं उपयोग होतो. सुरुवातीला एक चमचा पावडर वापरा आणि गरज वाटल्यास अजून एखादा चमचा पावडर घेऊ शकता. जर तुमच्या केसांचा रंग फिका असेल, तर कोको पावडरऐवजी दालचिनी पावडरचा उपयोग करा.
हेही वाचा : Sandwich Lovers , कोणत्याही पार्टीत ही ३ सँडविच ठरतील हिट! भन्नाट लुक अन् चव; रेसिपी बघा
कोरडा शाम्पू कसा बनवावा?
एका भांड्यात आरारूट पावडर किंवा कॉर्न स्टार्चमध्ये गडद रंगाच्या केसांसाठी कोको पावडर आणि फिक्या रंगाच्या केसांसाठी दालचिनी पावडर घ्या. या मिश्रणाला व्यवस्थित चाळून घ्या म्हणजे सर्व पदार्थ नीट मिसळतील.
त्यामध्ये तुम्हाला हवे असल्यास इसेन्शियल तेलाचे पाच ते १० थेंब मिसळा. त्याने तुमच्या कोरड्या शाम्पूला सुंदर सुगंध येतो. काही जण यासाठी लॅव्हेंडर, रोजमेरी यांसारख्या सुगंधी फुलांच्या तेलाचा वापर करतात; परंतु याचा जास्त वापर करणे टाळा.
तुमच्या कोरड्या शाम्पूचे हे मिश्रण तयार झाल्यानंतर त्याला एका बंद झाकणाच्या डब्यात साठवून ठेवा.
कोरडा शाम्पू कसा वापरावा?
घरगुती कोरडा शाम्पूचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम केसांच्या मधोमध भांग पाडा. नंतर घरी बनवलेला कोरडा शाम्पू या केसांवर भुरभुरवा. आता बोटांनी केसांना हलका मसाज करा म्हणजे हा शाम्पू केसांच्या मुळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. मसाज केल्यानंतर काही मिनिटांसाठी त्या शाम्पूला तसेच केसांमध्ये ठेवा आणि नंतर कंगव्याने केस विंचरून घ्या. अशाने हा कोरडा शाम्पू केसांमध्ये व्यवस्थित पसरण्यास मदत होते.
आता तुमचे केस अगदी केस धुतल्यानंतर दिसतात तसे दिसतील आणि सुंदर व स्वच्छ दिसतील. मग केस तुम्हाला हवे तसे सेट करून घ्या.