How to Choose The Perfect Kitchen Container Set : प्रत्येक महिला, तरुणी किंवा जेवण बनवणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्वयंपाकघरासाठी एक खास जागा असते. त्यामुळे दररोज वापरले जाणारे स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न असतो. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे ‘कंटेनर वापरणे’ (Kitchen Containers). या डब्यांमध्ये डाळी, साखर, मसाले आणि इतर वस्तू व्यवस्थित ठेवता येतात आणि त्यामुळे स्वयंपाकघर सुंदर व स्वच्छ दिसते. कंटेनरचा आणखी एक फायदा म्हणजे अन्न जास्त काळ ताजे ठेवण्यास मदत होते.
प्लास्टिकपासून काचेपर्यंत अनेक प्रकारचे कंटेनर बाजारात उपलब्ध असतात. फक्त त्यांची डिझाईन आणि आकार भिन्न असतात. बऱ्याचदा आपल्या स्वयंपाकघरसाठी योग्य कंटेनर (Kitchen Containers) निवडणे कठीण होऊ शकते आणि तुमच्या स्वयंपाकघराला योग्य नसलेले कंटेनर तुमच्याकडून खरेदी केले जाऊ शकतात.
हे लक्षात घेऊन, आज आम्ही तुम्हाला ५ वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेनरबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात सहजपणे वापरू शकता… (Kitchen Containers)
१. स्टेनलेस स्टील कंटेनर (Stainless steel containers)
स्टेनलेस स्टील कंटेनर बऱ्याच काळापासून स्वयंपाकघरात वापरले जात आहेत. या कंटेनरचा मुख्य फायदे म्हणजे ते टिकाऊ, आरोग्यासाठी सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल असतात. तसेच हे कंटेनर स्वच्छ करणेदेखील सोपे असतात. तुमच्या गरजेनुसार तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे कंटेनर खरेदी करू शकता. पण, कंटेनर खरेदी करताना १०० टक्के स्टेनलेस स्टीलचे आहेत ना हे एकदा तपासून बघा. कारण- लो-ग्रेड स्टीलपासून बनविलेल्या कंटेनरना (Kitchen Containers) लवकर गंजू पकडू शकतो. तसेच, झाकण हवाबंद आहे का, पदार्थ ठेवल्यावर गळणार वा बाहेर पडणार नाही ना याची खात्री करा.
२. काचेचे कंटेनर ( Glass Containers )
आजकाल बरेच लोक स्टोरेजसाठी काचेचे कंटेनर वापरण्यास प्राधान्य देतात. ते प्लास्टिक किंवा स्टीलच्या कंटेनरपेक्षा जास्त काळ टिकतात. स्नॅक्स, मसाले आणि इतर अनेक पदार्थ साठविण्यासाठी काचेचे कंटेनर वापरणे फायदेशीर ठरू शकते. काचेचे कंटेनर निवडताना, बोरोसिलिकेट ग्लासपासून बनवले आहेत का याची खात्री करा. कारण- ते उच्च तापमानातही पदार्थ व्यवस्थित साठवू शकतात आणि तुटण्याची शक्यतासुद्धा सुद्धा कमी असते. काचेच्या डब्याचा आकार पदार्थांनुसार ठरवणे योग्य असेल. उदाहरणार्थ- चहा, साखर किंवा मसाल्यांसाठी लहान कंटेनर आणि पीठ, तांदूळ किंवा मसूर डाळ साठविण्यासाठी मोठे व खोल कंटेनर वापरणे चांगले ठरेल.
३. प्लास्टिक कंटेनर (Plastic Containers)
प्लास्टिक कंटेनर स्वस्त आणि हलके असतात. त्यामुळे आपल्यातील प्रत्येक जण हे कंटेनर वापरतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोरडे पदार्थ साठवण्यासाठी योग्य प्लास्टिकचे कंटेनर निवडणे महत्त्वाचे आहे. कारण- कमी दर्जाचे प्लास्टिक तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. सुरक्षिततेच्या खात्रीसाठी नेहमी फूड-ग्रेड आणि BPA-फ्री प्लास्टिक निवडण्यावर भर द्या.
४. सिरॅमिक कंटेनर्स (Ceramic Containers)
तुमच्या स्वयंपाकघराला सुंदर, स्वच्छ लूक देण्यासाठी सिरॅमिक कंटेनर योग्य आहेत. हे कंटेनर विविध रंग, डिझाईनमध्ये उपलब्ध असतात आणि लोणचे किंवा इतर मसाले साठवण्यासाठी वापरले जातात. इतर कंटेनर्सच्या तुलनेने हे स्वस्त असतात आणि आपल्या स्वयंपाकघरातील काउंटरचे (ओट्याचे) सौंदर्य वाढवू शकतात. पण, सिरॅमिक कंटेनर खूपच जड असतात. त्यामुळे ते दैनंदिन स्टोरेजसाठी कमी वापरले जातात.
५. हवाबंद कंटेनर (Airtight Containers)
वस्तू साठविण्यासाठी हवाबंद कंटेनर हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. हे कंटेनर पूर्णपणे सील केलेले असल्याने हवेला आत जाण्यापासून किंवा बाहेर येण्यापासून प्रतिबंधित करतात. त्यामुळे पदार्थ सुरक्षित ठेवण्यास मदत होते. अशा कंटेनरमुळे अन्न जास्त काळ ताजे राहील. मसाले आणि स्नॅक्स साठविण्यासाठी हे हवाबंद कंटेनर खूप फायदेशीर आहेत.
तर वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे पाच कंटेनर (Kitchen Containers) तुमच्या स्वयंपाकघरासाठी वापरू शकता.