सकाळी पहिला चहा बनवताना किंवा ताजे दूध तापवतान आपले अगदी काही सेकंदांसाठी जरी लक्ष पातेल्यावरून विचलित झाले, तरी उकळत असलेला चहा किंवा दूध भरभर वर येते आणि पाहता-पाहता पातेल्यातून बाहेर सांडते, उतू जाते. घाई-गडबडीत असे ओट्यावर, गॅसच्या शेगडीवर सांडलेले दूध किंवा चहा म्हणजे अगदी कामत काम वाढवणारी गोष्ट. असे काही घडल्यानंतर, कुणाचीही चिडचिड होणे स्वाभाविक आहे. आपल्या दिवसाची सुरवात अशा विनाकारण वाढीव कामने व्हावी असे कुणालाही वाटत नाही. हो ना?
मग, आता यावर काय बरं करावे असा आपल्याला प्रश्न पडतो. मात्र इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @momsgupshup777 या अकाउंटवरून चहा आणि दूध उतू जाऊ नये यासाठी अतिशय सोप्या आणि भन्नाट अशा किचन हॅकचा व्हिडीओ शेअर झालेला आहे. दररोज वापरात असलेल्या या गोष्टींचा वापर आपण चहा आणि दूध उतू न जाण्यासाठी करू शकतो, असा विचारही तुमच्या मनात आला नसेल. काय आहेत हे दोन सोपे उपाय पाहा.
हेही वाचा : Kitchen gadget : केवळ ‘कागद’ नाही, तर ‘डोसा’सुद्धा एका मिनिटांत Print करता येईल! पाहा ‘या’ भन्नाट उपकरणाचा व्हिडीओ…
१. चहा उतू जाऊ नये यासाठी टीप
चहा बनवताना, स्वयंपाकघरात इतरही कुठली कामं करणार असाल तर, चहाचे आधण ठेऊन त्यात सर्व पदार्थ घालून घ्या. शेवटी दूध घातल्यानंतर जेव्हा चहा उकळण्याची वेळ येईल तेव्हा, पोळी किंवा चपात्या लाटण्यासाठी ज्या लाटण्याचा वापर केला जातो ते लाटणे चहाच्या पातेल्यावर ठेऊन द्या. त्यामुळे वर येणारा चहा आपोआप खाली जाईल. आता तुमचे लक्ष नसले तरीही, उकळत असलेला चहा कधीच उतू जाणार नाही. असे या व्हिडीओमध्ये केलेल्या प्रयोगावरून आपल्याला पाहायला मिळते.
२. दूध उतू जाऊ नये यासाठी टीप
दूध पिशवीमधून पातेल्यात तापवायला काढण्याआधी, त्या पातेल्यामध्ये एक वाटी ठेवा.
नंतर पतेल्यात दूध ओतून नेहमीप्रमाणे तापवण्यासाठी ठेऊन द्या.
असे केल्याने, दूध तापल्यानंतर पातेल्याच्या बाहेर येत नाही. असे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.
सोशल मीडियावर शेअर झालेल्या या घरगुती आणि सोप्या अशा किचन ट्रिकवर नेटकऱ्यांनीदेखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“वाह खूपच सुंदर उपयोग केला आहे लाटण्याचा.” असे एकाने कौतुक केले आहे. दुसऱ्याने, “माझी बायको मी चहा उतू घालवल्यावर लाटण्याचा उपयोग दम देण्यासाठी करते.” अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्याने, “लाटणे जळणार नाही का?” असा प्रश्न विचारला आहे. चौथ्याने, “दूध उतू न जाण्यासाठी सांगितलेली युक्ती खरंच उपयोगी आहे.” असे सांगितले आहे. तर शेवटी पाचव्याने, “एवढं करण्यापेक्षा पातेल्यातले दूध वर येई पर्यंत त्याकडे लक्ष द्या.” असे म्हंटले आहे.