How to Prevent Milk From Boiling Over: जेवण बनवताना फक्त एखादा चविष्ट पदार्थ बनवणे हे टास्क नसते तर त्याबरोबर अनेक लहान-मोठी आव्हानं असतात. ही आव्हानं रोज पुर्ण करत महिला जेवण दररोज जेवण बनवतात. दूध उकळताना उतू जाऊ नये याची काळजी घेणे, एखाद्या पदार्थासाठी लागणारा कांदा व्यवस्थित पण लवकर भाजणे, कारण कांद्यातील पाण्याच्या प्रमाणामुळे त्याला भाजायला खुप वेळ लागू शकतो. अशी लहान मोठी आव्हानं पुर्ण करत गृहिणी रोजचा स्वयंपाक करतात. यांसाठी काही उपाय मदत करतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.

दूध तापवायला ठेवलं की ते ऊतू जाणं ही तमाम महिलांची एक सामान्य समस्या आहे. दूध तापवणं हे एक महत्त्वाचं काम असतं. त्यामुळे आपण जेव्हा ओट्यासमोर असतो तेव्हाच आपण साधारणपणे दूध तापवायला ठेवतो. पण तरी एका मिनीटांत हे दूध वेगाने वर येतं आणि ऊतू जातंच. दूध ऊतू गेलं की सगळी गॅस शेगडी, ओटा सगळं खराब होतं आणि मग ते साफ करण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच राहत नाही. अशावेळी दूध वाया तर जातंच पण त्यावरची सायही वाया गेल्याने आपल्याला फार हळहळ वाटते. मग सगळं पातेलं खराब होतं आणि घासताना ते निघता निघत नाही. आता हे दूध ऊतू जाऊ नये म्हणून अशा कोणत्या युक्त्या आहेत ज्या वापरुन दूध वाया जाण्यापासून वाचवू शकतो

१. दूध तापवताना पातेल्याला कडेने तेलाचे बोट फिरवावे. यामुळे दूध ऊतू जाण्यासाठी वर येते तेव्हा ते तेल लावले आहे तिथपर्यंतच वर येते. तेलामुळे ते आहे तिथेच अडते आणि ऊतू जाण्यापासून वाचते. त्यामुळे अशाप्रकारे पातेल्याला तेल लावणे हा एक चांगला पर्याय ठरु शकतो.

२. याशिवाय दूध तापत असताना पातेल्यावर लाकडी उलथने किंवा लाकडी एखादी पट्टी आडवी ठेवावी. यामुळे दूध ऊतू जाण्यापासून वाचते. दूध वर येते तेव्हा या लाकडी पट्टीमुळे दूधावर आलेली साय फुटते आणि मग त्याखाली असलेले दूध आपोआप खाली दबले जाते. यामुळे दूध विनाकारण वाया जात नाही.

३. भांड्याच्या कडेला तूप किंवा बटर लावा. जेव्हाही तुम्ही दूध किंवा चहा उकळायला जाल तेव्हा भांड्याच्या वरच्या कडांवर थोडे तूप किंवा बटर लावा. यामुळे दूध उकळल्यावर फेस वर येत असला तरी भांड्यातून बाहेर पडणार नाही.

४.मंद आचेवर उकळवा – दूध आणि चहा जास्त आचेवर लवकर उकळतात आणि फेस तयार होण्याची प्रक्रिया वाढते. हे टाळण्यासाठी, नेहमी दूध किंवा चहा कमी आचेवर उकळवा. मध्यम किंवा कमी आचेवर उकळल्याने दूध किंवा चहा हळूहळू गरम होईल आणि फेस तयार होण्याची प्रक्रिया नियंत्रित होईल. दूध किंवा चहा मध्ये मध्ये ढवळत राहा जेणेकरून ते जळणार नाही आणि व्यवस्थित उकळेल.

५. भांड्यात एक स्टीलचा चमचा ठेवा. जेव्हा तुम्ही दूध किंवा चहा उकळता तेव्हा त्यात एक छोटा स्टीलचा चमचा ठेवा. हे उष्णता समान रीतीने वितरित करण्यास मदत करते आणि उकळणे नियंत्रित करते. स्टीलचा चमचा फेस तयार होण्यास देखील प्रतिबंधित करतो, जेणेकरून दूध किंवा चहा भांड्यातून बाहेर पडणार नाही.

    ६. मोठे भांडे वापरा. जर तुम्हाला जास्त प्रमाणात दूध किंवा चहा उकळायचे असेल तर नेहमी मोठे भांडे वापरा. ​​लहान भांडे लवकर फेसाने भरते आणि दूध किंवा चहा बाहेर पडू लागते. मोठ्या भांड्यात जास्त जागा असते, त्यामुळे उकळताना फेस सहज पसरतो आणि सांडण्याची शक्यता कमी होते.