उन्हाळा सुरु झाला की, अनेकांना विविध त्रास जाणवतात. काहींना उकाड्याचा फार त्रास होतो तर काहींना घरातील अन्न पदार्थ लवकर खराब होण्याचा त्रास होत असतो. उन्हाळ्यात फळे आणि भाज्या याव्यतिरिक्त असे बरेच पदार्थ आहेत जे काळजीपूर्वक साठवून ठेवले नाही तर ते लगेच खराब होतात. उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात दूध नेहमीच असते. उन्हाळा सुरू होताच स्वयंपाकघरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे दूध फाटणे. कधी कधी फ्रीजमध्ये ठेवलेले दूधही फाटते. अधिक तापमानामध्ये दूध टिकत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात दूध फाटण्याची समस्या अधिक दिसून येते. दूध फाटल्यानंतर दुधाची खूप नासाडी होते. उन्हाळ्यात दूध चांगलं राखणं हे सर्वात आव्हानात्मक काम असते. दूध फाटू नये असे आपल्याला वाटत असेल तर, या काही टिप्स फॉलो करा. या ट्रिकमुळे अति उष्णतेतही दूध चांगले, फ्रेश टिकून राहील व खराबही होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया सोप्या टिप्स…
उन्हाळ्यात दूध लवकर नासू नये म्हणून ‘या’ सोप्या गोष्टी करा
१. दूध गरम करण्यासाठी स्वच्छ भांड्याचा वापर करा
आपण दूध ज्या भांड्यात गरम करत आहात ते भांड अगदी स्वच्छ हवं. जर त्यात अन्य काही पदार्थांचे डाग असतील तर दूध खराब होऊ शकतं.
२. बेकिंग सोडा
जेव्हा आपण दूध उकळण्यासाठी गॅसवर ठेवतो तेव्हा त्यात एक चिमूटभर बेकिंग सोडा घाला. दुधात थोडासा बेकिंग सोडा घातल्यानेही दूध खराब होण्याची शक्यता कमी होते. ते अगदी कमी प्रमाणात वापरा.
(हे ही वाचा : Jugaad Video: पोळीच्या पिठात साबण किसून टाका; स्वयंपाकघरातील ‘या’ मोठ्या समस्येतून होईल सुटका)
३. फ्रीजमध्ये ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा
फ्रीजमध्ये दूध ठेवताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. दूध आम्लयुक्त गोष्टींपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. जसं की, टोमॅटोचा रस, चटणी, लिंबू इत्यादी दुधाजवळ ठेवू नका. दुधाभोवती कच्चे मांस किंवा खरबूज यांसारख्या वस्तू ठेवल्याने ते लवकर खराब होण्याची शक्यता असते.
४. दिवसभरात चार वेळा दूध गरम करा
उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये म्हणून ते २४ तासांत चार वेळा गरम करा. दोन ते तीन उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करा. दूध उकळवून झाल्यानंतर लगेच झाकून ठेऊ नका. त्यामधील वाफ कमी झाल्यानंतर झाकून ठेवा.
अशाप्रकारे वरिल सांगितलेल्या टिप्स फाॅलो करुन तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात दूध खराब होण्यापासून वाचवू शकता.