Kitchen Jugaad Diy Get Rid Of Lizards At Home : विचार करा, तुम्ही मस्तपैकी डाळीला तडका देताय आणि समोरच्या भिंतीवरून पाल जाताना दिसली तर? ऐकूनच किळसवाणे वाटले ना? पण, अनेक घरांत ही समस्या दिसून येते. कितीही साफसफाई केली, स्वच्छता केली तरी पाली आणि झुरळांचा उपद्रव काही कमी होत नाही. खास करून स्वयंपाकघरात पालींचा वापर अधिक दिसून येतो. कधी भांड्याच्या स्टँड मागे, कधी सिलिंडरच्या कोपऱ्यात, तर कधी गॅसवरील भितींवर पाल दिसून येते. अशावेळी पालींना घराबाहेर काढणे म्हणजे कठीण काम असते. तसेच त्या घरात राहिल्यास आजारपणाची भीती वाटते. त्यामुळे पालींना एका मिनिटात घराबाहेर पळवण्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्ही फॉलो करू शकता.
स्वयंपाकघरातून पाली, झुरळांना पळवण्यासाठी सहा सोप्या ट्रिक्स
१) अंड्याचे कवच
अंडा करी किंवा भुर्जी बनवल्यानंतर तुम्ही अंड्यावरील कवच फेकून देण्याऐवजी पालींना दूर ठेवण्यासाठी वापरा. कारण पाली अंड्याच्या कवचांचा वास सहन करू शकत नाहीत, ज्यामुळे तुम्ही अंड्यांची कवच खिडक्या, दारे किंवा ज्या ठिकाणी पालींचा सुळसुळाट अधिक आहे अशा ठिकाणी ठेवा. अंड्याच्या कवचाच्या वासाने पाली दूर पळून जातील. हानिकारक कीटकनाशके वापरण्याऐवजी हा एक नैसर्गिक उपाय आहे. पण, घरात स्वच्छता राखण्यासाठी दर दोन ते तीन दिवसांनी अंड्याचे कवच बदलत राहा.
२) काकडी
तुम्ही सॅलेड, रायत्यामध्ये काकडी आवडीने खात असाल; पण पालींना काकडीचा वास अजिबात आवडत नाही. पाली काकडीचा वास सहन करू शकत नाहीत, त्यामुळे एका काकडीचे चार तुकडे करा आणि स्वयंपाकघरातील विविध ठिकाणी ठेवा, ज्यामुळे स्वयंपाकघरात पाली तर दिसणार नाहीतच, पण काकडीच्या वासाने तुमचे स्वयंपाकघर ताजेतवाने राहील. पण, काकडीसुद्धा काही दिवसांनी बदलून टाका.
हेही वाचा – ट्रेनमध्ये माणुसकी म्हणून इतरांना मदत करताय, मग ‘हा’ Video पाहाच; लोक म्हणाले, “भावा…”
३) कॉफी पावडर पंच
तुमच्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात एक कप कॉफीने होत असेल. पण, तुम्हाला माहितेय का पालींना दूर ठेवण्यास तुम्ही कॉफी पावडरची मदत घेऊ शकता. त्यासाठी तंबाखू आणि कॉफी पावडर एकत्र करून, त्या मिश्रणाचे पाण्याच्या मदतीने छोटे छोटे गोळे बनवा. हे गोळे पाली ज्या ठिकाणी फिरताना दिसतात, तिथे ठेवा. पालीने हा गोळा खाल्ल्यावर ती तिथून पळून जाईल.
४) लसूण आणि लिंबू
पालींना लसणाचा उग्र वास अजिबात आवडत नाही. अशा स्थितीत एक कप पाणी घेऊन त्यात एक लिंबू पिळा, नंतर त्यात चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक करून मिक्स करा. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून चांगले हलवा आणि नंतर पाल दिसताच तिथे स्प्रे करा. अशाने पाल घरातून काही मिनिटांत पळून जाईल.
५) लवंग आणि काळ्या मिरीचे पाणी
पालींवर लवंग आणि काळ्या मिरीचे पाणी शिंपडल्यास त्यांचे डोळे जळू लागतात आणि मग त्या घाबरून पळून जातात. एक ग्लास पाण्यात थोडी ठेचलेली लवंग, काळी मिरी पावडर घाला आणि हे पाणी पालींवर शिंपडा. त्याचा परिणाम दिसू लागेल. काळ्या मिरीव्यतिरिक्त लाल तिखट किंवा चिली फ्लेक्सदेखील वापरता येईल.
६) स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा
स्वयंपाकघरात पाली बारीक किडे आणि झुरळं खाण्यासाठी फिरत असतात, यामुळे स्वयंपाकघरातील झुरळ आणि कीटक नष्ट करण्यासाठी वारंवार स्वच्छता राखा. किचनमधील सर्व कामं झाल्यानंतर किचनचा ओटा तेलाचे डाग वा अन्य कोणत्याही प्रकारे अस्वच्छ झाला असेल, तर तो ओटा लगेच जंतुनाशकमिश्रित पाण्यात भिजविलेल्या ओलसर कपड्याने स्वच्छ करा आणि नंतर स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून कोरडा करा.