Kitchen Jugaad : किचनमध्ये जेवण बनविताना टाइल्सवर भाजी, डोळ फोडणीला देताना तेलकट डाग पडतात. वेळच्या वेळी हे डाग साफ केले नाहीत, तर ते साफ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मग कितीही घासले, रगडले तरी हे डाग निघता निघत नाहीत. अशा वेळी सुरीने किंवा धारदार वस्तूने ते काढण्याचा आपण प्रयत्न करतो; पण त्यामुळे तुमच्या हाताला दुखापत होण्याची भीती असते. ते लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला आज अशा काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत की, ज्यांच्या मदतीने तुम्ही किचन टाइल्सवरील हट्टी डाग काही मिनिटांत स्वच्छ करू शकता. मग या सोप्या ट्रिक्स नेमक्या काय आहेत ते जाणून घेऊ…
दिवाळीला (Diwali 2024) अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे साफसफाईला अनेकांनी सुरुवात केली असेल. या निमित्ताने लोक घराचा अगदी कानाकोपरा स्वच्छ करतात. बहुतेक लोक साफसफाईची सुरुवात किचनपासून करतात.
किचनमधील कपाट, सिंक, गॅस इत्यादी लगेच साफ होते; परंतु तुमच्या किचनमधील टाइल्सवरील डाग मात्र साफ होत नाहीत. अशा वेळी तुम्हाला ज्या काही सोप्या ट्रिक्स फॉलो करायच्या आहेत, त्या खालीलप्रमाणे :
हेही वाचा – पाठीमागून मृत्यू आला अन्…; रस्त्यावरील थरारक अपघात, VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कोणाची?
किचन टाइल्सवरील तेलाचे डाग स्वच्छ करण्यासाठी तीन सोप्या ट्रिक्स
१) व्हाइट व्हिनेगर
व्हाइट व्हिनेगर जवळजवळ अनेकांच्या किचनमध्ये असते. त्याचा वापर जेवणाची चव वाढविण्याबरोबर इतरही अनेक गोष्टींसाठी केला जातो. किचन टाइल्सवरील तेलाचे चिकट डाग काढून टाकण्यासाठीही तुम्ही व्हाईट व्हिनेगरचा वापर करू शकता. त्यासाठी एका भांड्यात व्हाइट व्हिनेगर घ्या आणि थोडे पाणी घ्या. त्यात एक कपडा भिजवा. आता हा कपडा हलका पिळून, त्याने डाग लागलेल्या टाइल्सवर घासा. अशा प्रकारे चिकट डाग सहज साफ होण्यास सुरुवात होईल. तुम्ही कपड्याऐवजी स्क्रबरचाही वापर करू शकता. अशा प्रकारे टाइल्स स्वच्छ करा आणि पुन्हा दुसऱ्या कपड्याच्या मदतीने टाइल्स स्वच्छ पुसून टाका.
२) शॅम्पू आणि लिंबू
एक भांड्यात थोटे कोमट पाणी घ्या, त्या पाण्यात शॅम्पू आणि एका लिंबाचा रस नीट पिळून घ्या. त्यानंतर तयार मिश्रण नीट ढवळून घ्यावे. आता एक स्वच्छ स्पंज घ्या आणि तो पाण्यात बुडवा आणि त्याने संपूर्ण टाइल्स चांगल्या प्रकारे घासा. काही मिनिटे हे मिश्रण टाइल्सवर असेच राहू द्या. नंतर त्या टाइल्स स्वच्छ पाण्याने साफ करा.
३) डिशवॉशिंग जेल आणि सोडा
किचनच्या चिकट टाइल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही डिशवॉशिंग जेल आणि बेकिंग सोड्याचीही मदत घेऊ शकता. सर्वप्रथम हातांत ग्लोव्हज घाला. त्यानंतर एका भांड्यात कोमट पाणी घ्या. या पाण्यात थोडा बेकिंग सोडा व भरपूर डिशवॉशिंग जेल घाला आणि ढवळा. तयार मिश्रणात स्पंज बुडवून टाइल्स घासून स्वच्छ करा. असे केल्याने टाइल्सवरील तेलाचे चिकट डाग काही मिनिटांत स्वच्छ होतील.