How To Keep Ginger Fresh : टोमॅटो महागल्यानं देशभरातील सामान्य नागरिक व अगदी सेलिब्रिटींनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे. टोमॅटोमुळे खिशाला लागलेली कात्री आता पार सामन्यांच्या खिशाला भगदाडच पाडण्याची चिन्हे आहेत कारण, टोमॅटोपाठोपाठ आता आल्याचा दर सुद्धा ३०० रुपये किलोच्या पुढे गेला आहे. कर्नाटकात एक किलो आल्यासाठी लोकांना ४०० रुपयांपर्यंत खर्च करावा लागतोय. विशेष म्हणजे कर्नाटक हे देशातील दुसरे सर्वात मोठे आले उत्पादक राज्य आहे. असे असतानाही दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या आल्याचा तिखट दर महाराष्ट्रालाही झोंबायची शक्यता आहे. अशात तुम्ही आले खरेदी करून आणूनही फ्रीजमध्ये ठेवताना त्याची काळजी घेत नसाल तर खर्च केलेल्या पैशांचं सुद्धा नुकसान होऊ शकतं, म्हणूनच आज आपण काही स्मार्ट गृहिणींच्या स्मार्ट टिप्स जाणून घेणार आहोत जेणेकरून आलं फ्रीजमध्ये किंवा फ्रीज बाहेरही ताजे राहील.
सर्वात आधी आलं खरेदी करतानाच तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे पाहूया.
१) आले खरेदी करताना, नेहमी गुळगुळीत आणि पातळ पृष्ठभाग असलेले आलेच खरेदी करा.
२) तुटलेले आले घेणे टाळा.
३) आल्याचा वास घेऊन तपासा कुबट वासाचे आले घेणं टाळा.
फ्रीजमध्ये आले ताजे कसे ठेवावे?
१) आलं उघड्यावर ठेवू नका, तुम्ही एखाद्या झिपलॉक बॅग, अल्युमिनियम फॉईल किंवा अगदी जाडसर कापड किंवा कागदात सुद्धा आलं गुंडाळून ठेवू शकता. ज्यामुळे फ्रीजमधील आद्रतेशी आल्याचा थेट संबंध येत नातू/
२) आपण अनेकदा हिरवा मसाला खरेदी करतो म्हणजेच मिरची- कोथिंबीर- आलं सगळं एकत्र, आणि हे सगळं असंच एका डब्यात भरून ठेवतो. मिरची किंवा कोथिंबीर या मऊ असल्याने त्यामुळेही आले खराब होऊ शकते, सोपा उपाय म्हणजे सगळं काही वेगवेगळ्या डब्यात किंवा कागदात ठेवा.
३) आलं तुम्ही फर्मेंट करूनही वापरू शकता, म्हणजे काय? तर आल्याचे पातळ काप करून ते हलक्या मिठाच्या पाण्याने भरलेल्या बरणीत ठेवायचे जेणेकरून ते खराब होणार नाहीत.
४) आलं बाहेरून आणल्यावर धुवूनच स्टोअर करा पण तत्पूर्वी काहीवेळ किचन ओट्यावर एखादा कपडा अंथरून त्यावर हे आलं पसरवून ठेवा व त्याला हवा लागु द्या जेणेकरून ते पूर्णतः कोरडे होईल.
हे ही वाचा<< एक चमचा तूप पोळीवर लावून खाल्ल्याने शरीराला मिळणारे फायदे; वजनाची चिंता असेल तर वाचा
५) आल्याचा मोजून एकच तुकडा आणला आणि वापरला असं सहसा होत नाही. पण जो तुकडा तुम्ही अर्धवट वापरलाय त्याच्या टोकाला ओलावा असतो तो फ्रीजमधील हवेने सुकून जाऊ शकतो आणि मग हळूहळू आलं खराब होतं तर ते टोक कव्हर करायला विसरू नका. कापलेलं अर्ध आलं हे पूर्ण आल्याच्या तुकड्यासह ठेवू नका.
या सोप्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या तसेच असे अन्य काही जुगाड आपणही करत असल्यास कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.