Easy Idea Drying Clothes Rainy Season: पावसाळ्यात निसर्गातील हिरवळीमुळे प्रसन्न वाटते. परंतु, हवाहवासा वाटणाऱ्या पावसाळ्यात अनेक समस्याही जाणवतात. त्यातीलच एक मोठी समस्या म्हणजे पावसाळ्यातील दमट वातावरणात कपडे सुकवणे. पावसाळ्यात कपडे कसे सुकवायचे, हा मोठा प्रश्न गृहिणींसोबतच सगळ्यांना सतावत असतो. दमट वातावरणामुळे कपड्यांतील ओलावा तसाच राहतो, त्यामुळे कपडे सुकवण्यासाठी घरात दोऱ्या किंवा ऐनवेळी इस्त्रीचा वापरही करावा लागतो, पण आता काळजी करण्याची गरज नाही. एका गृहिणीने कपडे सुकविण्यासाठी जबरदस्त असा जुगाड दाखवला आहे. याचा परिणाम असा आहे की, पाहूनच तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. हा जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्ही कधी कपडे सुकविण्यासाठी झाडूचा वापर केला आहे का? झाडू आणि ओले कपडे तसा दोघांचाही एकमेकांशी काहीच संबंध नाही. पण, जर का तुम्ही या दोघांचा हा उपाय एकदा पाहिला तर तो पुन्हा पुन्हा कराल, असे गृहिणीचे म्हणणे आहे. प्रत्येक घरात स्वच्छतेसाठी झाडू वापरला जातो. साफसफाई करण्यासाठी नवनव्या वस्तू आल्या तरी आजही झाडू वापरला जातो. संपूर्ण घराची साफसफाई एकट्या झाडूने केली जाऊ शकते. पण, याच झाडूचा ओले कपडे सुकविण्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो, असे गृहिणीचे म्हणणे आहे. गृहिणीने व्हिडीओच्या माध्यमातून झाडू आणि ओले कपड्यांचा हा जुगाड दाखविला आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं काय करायचं आहे.
(हे ही वाचा: Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनासाठी ‘अशी’ सजवा तुमच्या राखीची थाळी; ‘या’ वस्तू चुकूनही विसरु नका, ही यादी एकदा वाचा!)
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने आधी दोन जुने खराब झालेले झाडू घेतले आहेत आणि झाडूला असलेला प्लास्टिकचा दांडा वेगळा काढला आहे. आता या दांड्यावर मार्कर पेनने साडेतीन इंच अंतरावर मार्क करून घेतलं आहे आणि या केलेल्या मार्कवर टोकदार वस्तूच्या मदतीने छिद्र पाडलं आहे. यानंतर सुतळी किंवा कापडापासून दोरी तयार केली आहे. मग ही दोरी झाडूच्या प्लास्टिकच्या दांड्यांच्या सर्व छिद्रामधून आरपार टाकून एका बाजूने बांधून घ्या, असं महिलेने सांगितले आहे. लक्षात ठेवा, दोरी एकसारखी हवी आहे. या दोरीचं दुसरं टोक दुसऱ्या दांड्यांच्या छिद्राला बांधलेले आहे. यानंतर दांडा एका बाजूने उघडा आणि एका बाजूने बंदिस्त करा, असे गृहिणीने सांगितले आहे. अशा प्रकारे तुमचा कपडे सुकवण्याचा स्टॅण्ड तयार होईल. अशावेळी तुम्ही घरातल्या घरात कपडे सुकवू शकता, पैसे खर्च न करता तुम्हाला मोठा फायदा होईल, असे महिलेचे म्हणणे आहे.
येथे पाहा व्हिडिओ
Shama DIYs & Reviews या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)