Kitchen Sink Clean Out Tips : बेसिनमध्ये भांडी घासताना अनेकदा उरलेलं खरकटं सिंकमध्ये अडकतं, ज्यामुळे सिंकमध्ये कोणतंही काम करणं अवघड होऊन जातं. सिंकमध्ये खूपवेळ पाणी तुंबून राहते, अशाने किचनमध्ये दुर्गंधी जाणवू लागते. अनेकदा जाळी लावूनदेखील सिंक ब्लॉक होते, त्यामुळे सिंक ब्लॉक होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही हात न लावता सिंक काही मिनिटांत स्वच्छ करू शकता.

रेसिपी मास्टर शेफ पंकज भदोरिया यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी ब्लॉक झालेले किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत, ज्याच्या मदतीने तुम्हाला सिंकमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी हात लावण्याचीही गरज भासणार नाही.

ब्लॉक झालेलं किचन सिंक काही मिनिटांत होईल स्वच्छ

मास्टर शेफ पंकज भदोरिया यांच्या मते, ब्लॉक झालेलं किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला चार गोष्टींची आवश्यकता असेल.

१) बेकिंग सोडा
२) लिंबाचा रस
३) व्हाइट व्हिनेगर आणि
४) गरम पाणी

सिंक स्वच्छ करण्यासाठी करून पाहा ‘हे’ उपाय

१) प्रथम किचन सिंक रिकामी करा.
२) आता सिंकच्या जाळीवर १/४ कप बेकिंग सोडा आणि १/४ कप लिंबाचा रस टाका आणि हे मिश्रण १५ मिनिटे तसेच राहू द्या.
३) ठरलेल्या वेळेनंतर, सोड्यावर अर्धा कप व्हाइट व्हिनेगर घाला. असे करताच सिंकमधून फेस येऊ लागेल.
४) जेव्हा सिंकमधून फेस पूर्ण बाहेर येणं थांबेल तेव्हा गरम पाण्याने भरलेला एक मग सिंकमध्ये ओता.
५) यामुळे सिंकमध्ये अडकलेली सर्व घाण पाईपद्वारे आपोआप साफ होऊन जाईल. यासह सिंकमधून येणारी दुर्गंधीही निघून जाईल.

किचन टाइल्स स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘ही’ ट्रिक

तुम्ही तेल, मसाल्याच्या फोडणीमुळे चिकट झालेल्या किचन टाइल्सदेखील वरील पद्धतीने स्वच्छ करू शकता. यावेळी तेलकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही गरम पाण्याबरोबर मीठ आणि डिटर्जंट पावडरचाही वापर करू शकता.

कसे वापरायचे?

१) एका बादलीत १/४ कप मीठ आणि थोडी डिटर्जंट पावडर घ्या. यानंतर त्यात गरम पाणी ओता.

२) गरम पाणी, डिटर्जंट आणि मीठ एकत्र केल्याने टाइल्सवरील तेलकट आणि चिकटपणा दूर होईल.

इतकंच नाही तर टाइल्सवर जमा झालेले बॅक्टेरियादेखील नष्ट करण्यास मदत होईल.

Story img Loader