पूर्वी सुकामेवा हे श्रीमंती खाणं आहे असं म्हटलं जायचं. परंतु, आता अनेक घराघरांमध्ये सुकामेवा सहज आढळून येतो. एखाद्या गोड पदार्थाची चव वाढविण्यासाठी गृहिणी हमखास त्या पदार्थात सुकामेवा किंवा सुक्या मेव्याची पूड करुन घालतात. त्यामुळे अनेक वेळा काही जण एकाच वेळी जास्त प्रमाणात सुकामेवा खरेदी करतात. परंतु, जास्त प्रमाणात आणलेला हा सुकामेवा वर्षभर टिकवणेदेखील गरजेचं आहे. कारण अनेक वेळा वातावरण बदललं की सुक्या मेव्यातील काही पदार्थ खराब होऊ लागतात. त्यामुळेच वर्षभरासाठी हा सुकामेवा कसा साठवून ठेवावा हे जाणून घेऊयात.

१. सुकामेवा ताजा असल्याची खात्री करणे-

कधीही बाजारात सुक्यामेव्याची खरेदी करताना तो ताजा आहे की नाही हे तपासून घ्यावे. जर या मेव्यातील पदार्थ जुने झाले असतील तर ते लवकर खराब होतात. त्यांना कुबट वास यायला लागतो आणि चवीलादेखील ते खऊट लागायला लागतात.

२. हवाबंद डब्यात ठेवा –

सुकामेवा हवेच्या संपर्कात आल्यामुळे लवकर खराब होतो. त्यामुळे शक्यतो ते हवाबंद डब्यात ठेवत जा. यासाठी बाजारात विविध आकाराचे आणि नामांकित ब्रॅण्डचे अनेक डबे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे शक्यतो ते हवाबंद डब्यात ठेवा. सुक्या मेव्याचा हवेशी संपर्क आल्यामुळे ते मऊ पडण्याची शक्यता असते. तसंच काही वेळा मनुकांना पाणीदेखील सुटतं आणि त्या चिकट होतात.

३. थंड आणि कोरड्या जागी ठेवा –

कधीही सुक्या मेव्याची साठवणूक करताना तो थंड आणि कोरड्या जागेवर ठेवा. जास्त उष्ण ठिकाणी त्यांना ठेवल्यास ते लवकर खराब होतात. तसंच ओलसर जागी ठेवल्यास त्यांना बुरशीदेखील लागू शकते. त्यामुळे शक्यतो ते थंड आणि कोरड्या जागीच ठेवावेत.

Story img Loader