आजच्या काळात वैयक्तिक अर्थकारणात रिटायरमेंट प्लॅनिंगला विशेष महत्व दिले जात असताना, तुमचा वृद्धापकाळ सुखाचा किंवा तणावमुक्त होण्यासाठी रिटायरमेंट प्लॅनिंग करणे फार गरजेचे आहे. वर्ष 2018मधील एचएसबीसीच्या “द फ्यूचर ऑफ रिटायरमेंट, द कॉस्ट ऑफ एजिंग” अहवालाप्रमाणे, ६८ टक्के भारतीय लोक रिटायरमेंटमध्ये त्यांच्या मुलांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करतात. अहवालात पुढे म्हटले आहे की सध्या फक्त ३० टक्के रिटायर्ड लोकांनाच अशी मदत मिळते आहे. उच्च राहाणीमानासोबतच दैनंदिन खर्च वाढत असताना मुलांवर अवलंबून राहाण्याऐवजी कामाला सुरूवात केल्या दिवसापासूनच रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करणे तुमच्या हिताचेच आहे.
रिटायरमेंटनंतर लागणारा पैसा उभा करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत: ईपीएफ आणि पीपीएफ. यात तुम्ही दीर्घकाळात नियमितपणे थोडा-थोडा पैसा टाकता ज्याने रिटायरमेंटच्या वेळी तुम्ही हा पैसा वापरू शकता. रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी ईपीएफ आणि पीपीएफ बऱ्यापैकी लोकप्रिय पर्याय आहेत कारण यात तुमची गुंतवणूक सुरक्षित राहाते आणि त्यावर एक निश्चित परतावा मिळतो. तसेच, या दोन्ही योजनांमध्ये कर सवलतीसह कर-समायोजित परतावा मिळतो. तरीही, तुम्ही दोन्हीमध्ये किंवा यापैकी एकात गुंतवणूक करून रिटायरमेंट सुरक्षित करण्याआधी दोन्हीमधील फरक जाणून घ्या.
पात्रता
ईपीएफचे (एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड) व्यवस्थापन एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) कडे असून यात फक्त पगारदार व्यक्तीच भाग घेण्यास पात्र आहेत. ही एक बंधनकारक बचत योजना आहे आणि 20 पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कुठल्याही कंपनीच्या कामगारांसाठी किंवा एका विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. दुसरीकडे, पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड) बँका आणि पोस्ट ऑफिस कडून देऊ केली जाणारी एक सार्वजनिक योजना आहे, मग तुम्ही पगारदार असा किंवा नाही.
अंशदानाचे नियम
जर तुम्ही ईपीएफओच्या नियमांच्या अंतर्गत येणाऱ्या संगठनात काम करता, तर अशा पगारदारांसाठी ईपीएफमध्ये गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. तुमच्या मूळ वेतन + डीएच्या १२ टक्के पर्यंत रक्कम कापली जाऊन तुमच्या ईपीएफ खात्यामध्ये जाते. यात तुमच्या कंपनीचे अंशदान सुद्धा जोडले जाते, जे तुमच्या रकमेएवढेच असते. जर तुम्हाला अधिक बचत करण्यासाठी तुमचे ईपीएफमधील अंशदान वाढवायचे असले, तर तुम्ही तुमच्या कंपनीला विनंती करू शकता आणि व्हीपीएफसाठी (स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना) अर्ज करू शकता, ही ईपीएफचीच एक विस्तार-योजना आहे. लक्षात ठेवा की व्हीपीएफमध्ये गुंतवणूक करणे सर्वस्वी तुमच्या इच्छेवर असते आणि जरी तुम्ही तुमचे अंशदान वाढवलेत, तरी तुमची कंपनी तसे करण्यास बाध्य असणार नाही.
पीपीएफसुद्धा एक स्वैच्छिक रिटायरमेंट योजना आहे जिची सुरूवात रिटायरमेंटसाठी बचत करणे सुलभ करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी केली गेली होती. एका वित्तीय वर्षामध्ये तुम्ही किमान रू. ५०० आणि कमाल रू. १.५ लाख एवढी गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक एकरकमी किंवा हप्त्यांनी केली जाऊ शकते.
व्याजाचा दर
ईपीएफवरील व्याजाचा दर दरवर्षी ईपीएफओद्वारे घोषित केला जातो. वर्ष २०१७-१८ साठी हा दर ८.५५ टक्के एवढा होता. पीपीएफचा व्याजाचा दर 10-वर्षीय सरकारी बाँडच्या परताव्याशी निगडित असतो आणि दर तीन महिन्यांनी बदलतो. वर्ष २०१८-१९ च्या शेवटच्या तीन महिन्यांसाठी पीपीएफचा व्याजाचा दर ८ टक्के आहे.
कर लाभ
ईपीएफमधील मुदत पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम तेव्हाच कर-मुक्त असते जेव्हा तुम्ही किमान पाच वर्षे सलग नोकरी केलेली असेल. जर तुम्ही या दरम्यान दुसरी नोकरी धरलीत, तर यावरील कर वाचवण्यासाठी तुम्ही आपल्या नवीन नियोक्ताकडे तुमचे विद्यमान ईपीएफ खाते हस्तांतरित करू शकता. तसेच, जर तुम्हाला नोकरी नसेल, तर त्या काळातील ईपीएफ रकमेवरील व्याज कर-योग्य असते. या उलट, कर-संबंधात पीपीएफचा दर्जा ईईई असतो. म्हणजेच, पीपीएफमधील गुंतवणूक सर्व स्तरांवर, अंशदान, संचय आणि परिपक्वता कर-मुक्त आहे.
लॉक-इन कालावधी
ईपीएफ खात्याचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा असतो, जेणेकरून तुम्हाला कर-लाभ मिळतात. तसेही, तुम्ही नोकरी बदलल्यास प्रत्येक नवीन नियोक्त्याकडे हे खाते ट्रान्सफर केले जाऊ शकते. तुम्ही ५५ वर्षे वयानंतर परिपक्वता रक्कम रिटायरमेंट घेतल्यावर काढू शकता. पीपीएफमधून तुम्ही १५ वर्षांनंतरच पैसे काढू शकता.
मुदत-पूर्व पैसे काढणे
पाच वर्षे सलग नोकरी झाल्यावर तुम्ही ईपीएफ मधून कर-मुक्त रक्कम काढू शकता. पाच वर्षे पूर्ण व्हायच्या आधी जर तुम्ही पैसे काढलेत, तर ईपीएफओकडे तुमचा पॅन तपशील नसल्यास ३० टक्के आणि पॅन तपशील असल्यास १० टक्के कर-कपात होते. तसेच, मुदत-पूर्व रक्कम काढणे काही विशिष्ट कारणांसाठीच करता येते, जसे मुलांच्या लग्नासाठी, गृह कर्जाच्या परतफेडीसाठी, आजाराच्या इलाजासाठी इ. प्रत्येक कारणासाठी मुदत निराळी आहे. उदाहरणार्थ, मुलांच्या लग्नासाठी ७ वर्षांनंतरच पैसे काढता येतात. या वर्षीच लागू केलेल्या नवीन नियमांप्रमाणे जर तुम्ही किमान एक महिना नोकरीशिवाय असलात, तर तुम्ही ईपीएफमधील रकमेचा ७५ टक्के भाग काढू शकता. अशा वेळी तुमचे खाते नवीन नोकरी मिळेपर्यंत ईपीएफओ सोबतच राहाणार. तसेच, दोन महिने नोकरीशिवाय असलात, तर तुम्ही उर्वरित रक्कम सुद्धा काढू शकता.
सातव्या वर्षापासून तुम्ही पीपीएफ खात्यामधून काही नियमांच्या अधीन राहून रक्कम काढू शकता. ही रक्कम तुमच्या चौथ्या वर्षाच्या शेवटी जमा रकमेच्या ५० टक्के, किंवा तुम्ही रक्कम काढीत आहात त्या वर्षाच्या आधीच्या वर्षाच्या शेवटी जमा रकमेच्या ५० टक्के असू शकते. हे लक्षात घ्या की तुम्ही वर्षातून एकदाच रक्कम काढू शकता, पण चांगली बातमी अशी की ही रक्कम कर-मुक्त आहे. रिटायरमेंटच्या नंतरच्या काळासाठी तुम्ही सुरक्षित बचत करण्यासाठी या दोन पर्यायांवर अवलंबून राहू शकता, आणि म्हणूनच तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ निर्माण करताना किंवा हाताळताना यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.
आदिल शेट्टी
सीईओ, बँकबझार