आल्याचा कडक चहा कोणाला आवडत नाही? जर चहात आलं घातलं असेल तर त्याची चव ही अनेक पटीने वाढते. आल्याचा चहा पिल्याने कफची समस्या ही दूर होते. चहा बनवताना काही लोक आलं किसून त्यात घालतात. तर काहीजण बारीक ठेचून. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे यापैकी कोणती पद्धत योग्य आहे? या दोन्ही पद्धतींमध्ये असा काय फरक आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
खरं तर, किसलेलं आलं घातल्याने चहाची चव ही ठेचलेल्या आल्याच्या चहापेक्षा वेगळी असते. याशिवाय चहामध्ये आलं घालण्यासाठीही एक योग्य वेळ असते. यावेळी चहामध्ये आलं घातलं तर त्याची चव उत्तम होते. तर, कोणती पद्धत ही योग्य आहे ते आज आपण जाणून घेऊया…
आणखी वाचा : पीठ मळताना ही ट्रीक नक्की वापरा, पोळी फुलल्याशिवाय राहणार नाही
– जर चहामध्ये आलं कुटून घातलं तर त्याची चव कमी होते. यामागे एक खास कारण आहे. आलं कुटलं की त्याचा बहुतेक रस हा भांड्यात राहतो. यामुळे चहामध्ये आल्याची चव ही कमी असते आणि त्याचा जास्त फायदा हा शरीराला होत नाही.
– तर, किसलेलं आलं चहात घातलं तर त्याचा पूर्ण रस हा चहात जातो. यामुळे चहाची चव अप्रतिम होते आणि आल्याच्या रसाचा पूर्ण फायदा आपल्या शरीराला मिळतो.
आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात भात योग्य की पोळी?; जाणून घ्या कसा असावा रात्रीचा आहार
– यामुळे जर तुम्ही चहात आलं घालत असाल तर ठेचण्या ऐवजी त्याला किसून घाला. याचा शरीरीला पूर्ण फायदा होतो आणि चवही अप्रतिम होते.
चहात कोणत्या वेळी आलं घालावे?
चहात आलं कोणत्या वेळी घातलं पाहिजे हे अनेकांना महत्वाचं वाटणार नाही. मात्र, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही चहा बनवणार, तेव्हा सगळ्यात आधी पाण्यात चहा पावडर आणि साखर घाला. त्याला चांगली उकळी आली की त्यात दूध घाला. दूध घातल्यानंतर चहाला एक उकळी येऊ द्या. त्यानंतर त्यात किसलेलं आलं घाला. यावेळी चहात आलं घातल्याने आल्याची संपूर्ण चव ही चहात येते आणि त्याचे संपूर्ण गुणधर्म ही शरीराला मिळतात.