Tomato Flu Prevention: केरळमधील कोवलम जिल्ह्यात या वर्षी ६ मे रोजी टोमॅटो फ्लूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर जवळपास ८२ नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत, टोमॅटो फ्लूची प्रकरणे केवळ ५ वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा संसर्ग टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जी वेळीच जाणून घेणं गरजेचं आहे.
टोमॅटो फ्लू ची लक्षणे काय आहेत?
टोमॅटो तापाच्या लक्षणांमध्ये जास्त ताप, स्नायू दुखणे, अशक्तपणा, हृदयाचे ठोके वाढणे, सांधेदुखी, खाज सुटणे, उलट्या होणे, शरीरातील पाणी कमी होणे, जुलाब इत्यादी समाविष्ट आहेत. यामध्ये अंगावर येणारे पुरळ हे माकडपॉक्ससारखेच आहेत.
( हे ही वाचा: Coronavirus: भविष्यात करोनाचे आणखी संसर्गजन्य प्रकार येऊ शकतात; जाणून घ्या WHO दिलेली चेतावणी)
टोमॅटो फ्लू कसा टाळायचा?
- स्वच्छता आणि सॅनिटेशनची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, संक्रमित मुलाची खेळणी, कपडे किंवा इतर गोष्टी निरोगी मुलांपासून दूर ठेवा.
- टोमॅटो फ्लू टाळण्यासाठी सरकारने काही महत्त्वाची खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे
- रुग्णाला एकांतात ठेवा आणि घरातील इतर लोकांच्या संपर्कात त्यांना येऊ देऊ नका, विशेषत: मास्क नसलेल्यांना.
- मुलांना टोमॅटो फ्लू, तसेच त्याची चिन्हे, लक्षणे आणि दुष्परिणामांबद्दल शिकवा.
- मुलाला इतर मुलांना स्पर्श किंवा मिठी न घालण्याचा सल्ला द्या, विशेषत: जर इतर मुलामध्ये ताप किंवा फोड यांसारखी लक्षणे दिसत असतील.
- मुलांना स्वच्छतेबद्दल शिकवा आणि शिक्षित करा. तसेच त्यांना अंगठा किंवा बोट चोखण्याची सवय असेल तर ती लवकर बंद करा.
- वाहणारे नाक किंवा खोकला असताना मुलाला रुमाल वापरण्यास शिकवा, जेणेकरून संसर्ग इतरांपर्यंत पसरू नये.
- जर तुम्हाला टोमॅटो फ्लूमुळे फोड आले असतील तर ते फोडू नका आणि त्यांना स्पर्श केल्यानंतर आपले हात धुवा.
- तुमच्या मुलाला हायड्रेटेड ठेवा. जास्त पाणी पिणे का महत्त्वाचे आहे ते त्यांना शिकवा. पाण्याव्यतिरिक्त त्यांना दिवसभर दूध, ज्यूस इत्यादी गोष्टी देखील द्या.
( हे ही वाचा: COVID Symptoms 2022: ताप, खोकला नाही तर ‘ही’ ३ विचित्र लक्षणे आता करोना रुग्णांमध्ये दिसत आहेत; वेळीच सावध व्हा)
- तुमच्या मुलामध्ये टोमॅटो फ्लूची लक्षणे आढळल्यास, त्याला इतरांपासून वेगळे करा जेणेकरून कुटुंबातील इतरांना संसर्ग टाळता येईल.
- सर्व भांडी, कपडे आणि इतर आवश्यक गोष्टी वेगळ्या ठेवा आणि घराची स्वच्छता ठेवा.
- बाळाला आंघोळ घालण्यासाठी किंवा त्वचा स्वच्छ करण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा.
- रुग्ण आणि घरातील इतर लोकांना फक्त पौष्टिक, संतुलित आहार द्या जेणेकरून रोग प्रतिकारशक्ती वाढेल.
- रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, मुलाला जास्तीत जास्त विश्रांती द्या जेणेकरून पुनर्प्राप्ती लवकर होईल.
- टोमॅटो फ्लू सामान्यतः १ ते १० वर्षे वयोगटातील मुलांमध्ये दिसून येतो, परंतु तो प्रौढांना देखील प्रभावित करू शकतो.