आपले शरीर ही एक यंत्रणा आहे. ती समजून घेऊन त्यानुसार काळजी घेतल्यास ही यंत्रणा दिर्घकाळ आणि चांगल्या पद्धतीने काम करते. मेटाबॉलिक रेट ही शरीरातील एक महत्त्वाची यंत्रणा आहे. आता मेटाबॉलिक रेट किंवा मेटाबॉलिझम म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. आपण जे अन्न, हवा शरीरात घेतो ते शरीरात योग्य पद्धतीने साठवले जातात आणि गरजेनुसार वापरले जातात. तसेच वेगवेगळ्या अवयवांमध्ये या घटकांचे पोषण केले जाते. शरीराची बांधणी करणे आणि शरीर तोडणे अशा दोन गोष्टी यामध्ये घडत असतात. या सर्व प्रक्रियेसाठी विशिष्ट गती असते. त्या गतीला मेटाबॉलिक रेट असे म्हणतात. या प्रक्रियेमध्ये काही कॅलरीज जळतात, यासाठी ऊर्जा लागते.
हा मेटाबॉलिक रेट मोजतात कसा तर आपल्या शरीरातील स्नायूंच्या प्रमाणात हा रेट असतो. मेटाबॉलिक कार्टमध्ये हा रेट मोजता येतो. आपण झोपलेले असताना आपले अवयव कार्यरत असतात. त्यासाठी ऊर्जा लागते त्याला म्हणतात रेस्टींग मेटाबॉलिक रेट. खाल्लेले अन्न पचवण्याकरता लागणाऱ्या उर्जेला म्हणतात स्पेसिफीक डायनॅमिक अॅक्शन ऑफ फूड. तिसरी म्हणजे आपण प्रत्यक्ष काम करतो तेव्हा लागणारी ऊर्जा अशा तिन्ही ऊर्जांना मेटाबॉलिक रेट म्हणतात.
अनेकदा आपण कितीही व्यायाम केला तरी ऊर्जा खर्च होत नाही असे म्हटले जाते, पण हा गैरसमज असतो. मेटाबॉलिक रेटसाठी व्यायाम करणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. स्नायू बळकट झाले तर मेटाबॉलिक रेट वाढतो. मात्र व्यायाम न करता शॉर्टकटने तो वाढवण्याचे प्रयत्न केले जातात, पण ते चुकीचे आहेत. त्यामुळे मेटाबॉलिक रेट वाढवायचा असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही.