शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दररोज अंघोळ करणे महत्वाचे आहे. रोज सकाळी अंघोळ केल्याने फ्रेश वाटण्यास मदत होते. शिवाय अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते; कारण अंघोळीमुळे शरीराची स्वच्छता राखता येते. पण, प्रत्येकाची अंघोळ करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. म्हणजे काही जण अगदी दोन मिनिटांत अंघोळ करतात, तर काही जण अर्धा-अर्धा तास अंघोळीसाठी घालवतात. अशावेळी बहुतेक लोक अंघोळीसाठी काही चुकीच्या पद्धतींचा अवलंब करतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे आपण आज अंघोळ करण्याची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत.
अंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती?
१) जास्त वेळ अंघोळ करू नका
जास्त वेळ पाण्यात अंघोळ केल्याने त्वचा आणि केस खूप कोरडे होतात. तज्ज्ञांच्या मते, कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी फक्त पाच मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय एकाचवेळी मिनिटभर पाण्यात उभे राहू नका.
२) कोमट पाण्याचा वापर करा
गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेलकटपणा कमी होतो. यामुळे त्वचेचे नुकसान होते. म्हणून कोमट किंवा थंड पाण्याने अंघोळ करणे शरीरासाठी चांगले असते.
३) केस जास्त धुवू नका
केस मृत त्वचेच्या पेशींनी बनलेले असतात. अशा स्थितीत शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे ते वारंवार धुण्याची गरज नाही, वारंवार केस धुतल्यामुळे केस खूप कोरडे होऊ शकतात.
४) त्वचा टॉवेलने रगडून पुसू नका
अंघोळीनंतर त्वचेला जोरात रगडून पुसू नका, हलक्या हाताने ती टॉवेलने पुसा. त्वचा खूप घासून कोरडी केलीत, तर त्वचेला खाज सुटू शकते किंवा खूप जळजळू शकते. तसेच शरीराचे काही अवयव नीट कोरडे पुसून घेतले का याची खात्री करा.
५) मॉइश्चरायझर वापरा
अंघोळीनंतर दोन ते तीन मिनिटांनी लगेच मॉइश्चरायझरचा वापर केला पाहिजे. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर तुम्ही अंघोळ करा किंवा नको, पण दिवसातून किमान दोनदा स्वत:ला मॉइश्चराइज केले पाहिजे.
कोणत्या साबणाचा वापर केला पाहिजे?
काही तज्ज्ञांच्या मते, अंघोळीच्या काही साबणांमुळे तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेलकटपणा कमी होऊ शकतो. अशावेळी त्वचा स्वच्छ करण्यासाठी मॉइश्चरायझिंग बॉडी वॉशसारख्या क्लीन्सर लेबल असलेली प्रोडक्ट वापरण्याचा सल्ला दिला जातो.